“जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून अनाथांना प्रमाणपत्र मिळविण्याची सोय”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १६; (गडचिरोली) : अनाथांना शिक्षण व नोकरीत 1 टक्का आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही अनाथ या लाभापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘अनाथ प्रमाणपत्र’ वितरीत करण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 157 अनाथ बालकांना हे प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यापैकी 5 जणांना शासकीय नोकरीही लागली आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार बालकांना जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, तसेच कुटुंबात राहून ज्या अनाथ बालकांचे संगोपन झालेले आहे अशा बालकांना संस्थात्मक व संस्थाबाह्य या नमुन्यात अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे. यानुसार विविध विभागांच्या झालेल्या पद भरतीमध्ये आतापर्यंत 5 बालके शासकीय नोकरीवर लागले.
असे आहेत अनाथ प्रमाणपत्रासाठीचे निकष
‘संस्थात्मक’ या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे, ज्यांचे शासन मान्यताप्राप्त संस्थामध्ये पालन-पोषण झाले आहे, त्यांच्या नातेवाईकांची अथवा जातीची माहिती उपलब्ध असो किंवा नसो अशा बालकांचा समावेश असेल. ‘संस्थाबाह्य’ या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासनमान्य संस्थांबाहेर / नातेवाईकांकडे संगोपन झालेले आहे, अशा बालकांचा समावेश असेल.
अनाथ प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे
विहित नमुन्यातील लाभार्थ्यांचा अर्ज, वडिलांच्या मृत्युचा दाखला, आईच्या मृत्युचा दाखला, जातीचा दाखला, लाभार्थी बालकाचे आधार कार्ड, लाभार्थी पालकांचे आधार कार्ड, लाभार्थीचा जन्मदाखला, शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्र (बोनाफाईड) किंवा टी.सी., अनाथ असल्याबाबत ग्रा.पं / न.प.यांचे शिफारस प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचे फोटो. ही सर्व कागदपत्रे तीन संचासह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावे.
अनाथ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व अधिक माहितीकरिता जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक -07132-222645 तसेच Email Id : dcpu.gadchiroli@gmail.com यावर किंवा संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) मोबाईल क्र.9595644848 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.