April 25, 2025

सृष्टी संस्थेची मत्स्यक्रांती: गडचिरोलीच्या तलावातून गावकऱ्यांचे स्वप्न साकार!

गडचिरोली, एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, कोरची आणि धानोरा या तालुक्यांमध्ये सृष्टी संस्थेने मत्स्यपालनाच्या माध्यमातून एक अनोखी सामाजिक क्रांती घडवली आहे. या उपक्रमातून ग्रामसभा सोसायटी आणि महिला बचत गटांना सक्षम बनवण्या बरोबरच आदिवासी आणि पारंपारिक वननिवासी समुदायांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. “अनुसूचित जमाती इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006″ आणि त्यातील सुधारित नियम2008 2012 यांचा आधार घेत सामुदायिक वन हक्क क्षेत्रातील तलावांचा विकास करून हा बदल घडवला जात आहे.

सृष्टी संस्थेचे संयोजक  केशव गुरनुले यांच्या मार्गदर्शना खाली गावा गावांत जनजागृती मोहीम राबवण्यात आली. ग्रामसभांना सामुदायिक वन हक्कांचा वापर करून मत्स्यपालना द्वारे रोजगार निर्मिती कशी करता येईल, हे पटवून देण्यात आले. गडचिरोली सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागातून रोजगारासाठी बाहेर भटकणाऱ्या गावकऱ्यांना आता स्थानिक पातळीवरच उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. या कार्यातून गावांचे आर्थिक स्वावलंबन तर वाढलेच आहे, शिवाय सामुदायिक एकात्मताही दृढ झाली आहे.

या उपक्रमाची खास बाब म्हणजे महिलांना मासेमारी आणि मत्स्यपालन व्यवसायात सक्रिय सहभागी करून घेणे. ” महिला मासेमारीसाठी सक्षम नाहीत का?” आणित्यांचा या क्षेत्रात वाटा का नाही?” असे प्रश्न उपस्थित करत सृष्टी संस्थेने महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना या व्यवसायात सामील करून घेण्यातआले. यामुळे केवळ पुरुषांवर अवलंबून असलेली कुटुंबे आता महिलांच्या योगदानानेही बळकट होत आहेत.

सध्याच्या काळात बंगाली माशांचे उत्पादन वाढल्याने तलावातील मूळ मासे आणि जैवविविधता धोक्यात आली होती. हे लक्षात घेऊन सृष्टी संस्थेने तलावांचे पुनर्जनन करण्याचा संकल्प केला. वडसा तालुक्यातील बोळधा, कोरेगाव, चोप, शंकरपूर, आमगाव; कुरखेड्यातील आंधळी, सोनपूर, चिपरी, दल्ली, नल्लीकसा, ढुशी, फरी, कसारी, नावेझरी, येरंडी; कोरचीतील आगरी, बिजेपार, सावली आणि धानोर्‍यातील ढवळी, परस विहीर या गावांतील तलावांमध्ये हे कार्य हाती घेण्यात आले. तलाव स्वच्छ करून पाण्यातील ऑक्सिजन पातळी वाढवली गेली, तसेच सदाफुली काढून माशांसाठी पोषक वनस्पती जैसे की गाद, परसोड, चिल्ला, चिऊल, सावा, कमळ आणि पवन यांची लागवड करण्यात आली.

या तलावांमध्ये मूळ मासे (कतला, रोहू, मिरगल, सिप्नस) यांचे मत्स्यबीज टाकून बांबू केज आणि पेन कल्चर सारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. लहान माशांना मोठ्या माशांपासून संरक्षण देण्यासाठी ग्रीन नेट जाळी आणि मत्स्य खाद्य पदार्थांचा वापर करून मत्स्यबीजांचे संगोपन केले जाते. त्यानंतर हे मासे मुख्य तलावात सोडून व्यावसायिक उत्पादनाला चालना दिली जाते. विशेष म्हणजे, वडसा आणि कुरखेडा तालुक्यांतील बारमाही पाणी असलेल्या तलावांमध्ये डोंग्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे गावकऱ्यांना वर्षभर मासे पकडून स्वतःच्या वापरासाठी आणि विक्रीसाठी उत्पन्न मिळवता येत आहे.

या उपक्रमामुळे बचत गट, मासेमारी सोसायटी आणि ग्रामसभांचे आर्थिक उत्पन्न लक्षणीय वाढले आहे. गावकऱ्यांना आता मासेविकून मिळणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाची गरज भागवता येत आहे, तर काहींनी यातून छोटे व्यवसायही सुरू केले आहेत. “हा उपक्रम केवळ रोजगाराची संधीच नाही, तर जैव विविधतेचे संरक्षण, महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक सुंदर संगम आहे,” असे केशव गुरनुले यांनी सांगितले.

गडचिरोलीच्या या ग्रामीण भागात घडलेला हा बदल आता राज्यातील आणि देशातील इतर दुर्गम भागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. सृष्टी संस्थेच्या या कार्याने गावकऱ्यांच्या जीवनात आशेचा नवीन किरण आणला असून, शाश्वत विकासाचा एक नवा मार्ग उघडला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!