गडचिरोलीत बीएसएफ जवानाचा अपघात, प्रकृती चिंताजनक; नागपूरात उपचार सुरू

गडचिरोली, २९ एप्रिल : सिरसी गावाजवळ २७ एप्रिल रोजी रात्रो १० च्या दरम्यान मित्रांसोबत स्नेहभोजन आटोपून गडचिरोलीकडे परत येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बीएसएफ जवान प्रवीण खोबरे (वय ३५) यांना गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
प्रवीण खोबरे हे बीएसएफच्या ८१व्या बटालियनमध्ये त्रिपुरा येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर गडचिरोलीत आलेले प्रवीण यांच्यासाठी मित्रांनी सिरसी येथे स्नेहभोजन आयोजित केले होते. रात्री घरी परतताना त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याकडेच्या झाडावर आदळले. शुद्धीवर असताना त्यांनी मित्रांना घटनेची माहिती दिली. मित्रांनी तातडीने त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात प्राथमिक तपासणीत प्रवीण यांच्या पोटात तीव्र वेदना असल्याचे आढळले. सोनोग्राफी आणि एक्स-रे तपासणीत त्यांच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी त्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. नागपूर येथे काल त्यांच्यावर चार तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु पुढील ४८ तास त्यांच्या प्रकृतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्रवीण यांचे मित्र नागपूर येथे त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, नागपूर येथील स्थानिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
चापलवाडा येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रवीण यांच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. वडिलांचे छत्र हरपलेल्या या कुटुंबावर आता मोठे संकट कोसळले आहे. प्रवीण यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.