अहेरीतील भ्रष्टाचारावर अजयभाऊंचा प्रहार: आमरण उपोषणाने प्रशासनावर दबाव
गडचिरोली, 9 जुलै : अहेरी तालुक्यातील शासकीय योजनांना भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचा गंभीर आरोप करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. प्रशासनाच्या बेपर्वाईविरुद्ध हा लढा उभारताना त्यांनी जनतेच्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला आहे. यापूर्वी 30 जून रोजी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा जाब विचारला होता, पण कारवाईच्या नावावर फक्त शांतता मिळाली.
अजयभाऊंचा ठाम आरोप आहे की, अहेरी आणि भामरागड तालुक्यातील जलजीवन मिशन, अंगणवाडी भरती, आणि पाणीपुरवठा योजनांना भ्रष्टाचाराने विळखा घातला आहे. निकृष्ट दर्जाचे पाईप, अपूर्ण कामे आणि लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी तर कामे फक्त कागदावरच दिसतात, तर फलक लावून औपचारिकता पूर्ण केली जाते. यासंदर्भात त्यांनी सातत्याने चौकशीची मागणी केली, पण प्रशासनाने डोळेझाक केल्याने अखेर त्यांना उपोषणाचा कठोर निर्णय घ्यावा लागला.
या आंदोलनाने संपूर्ण गडचिरोलीत खळबळ उडाली आहे. खासदार नामदेवराव किरसन आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अजयभाऊंच्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस, भाजप आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी उपसरपंच कार्तिक तोगम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला बळ दिले.
सर्वांनी एकमुखाने प्रशासनाला भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा इशारा देत अजयभाऊंच्या उपोषणाला जोरदार समर्थन दिले. हे आंदोलन केवळ एका व्यक्तीचे नाही, तर गडचिरोलीच्या जनतेच्या हक्कांसाठीचा लढा आहे. अजयभाऊ कंकडालवार यांचे हे उपोषण प्रशासनाला जागे करण्यात यशस्वी ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी तोडली जात नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
