September 3, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

पालकांना आमिष, विद्यार्थ्यांची ‘टीसी’ वळती!

“कुरखेडा तालुक्यात शाळांमध्ये विद्यार्थी पळवापळवीचे आरोप; मोबाईल, मोफत प्रवेश व शैक्षणिक साहित्याच्या आमिषांची चर्चा”

कुरखेडा | प्रतिनिधी — ताहीर शेख
दिनांक : २ सप्टेंबर २०२६

कुरखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील काही नामांकित तसेच अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या कमी-जास्त करण्यासाठी पालकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून विद्यार्थ्यांची ‘टीसी’ वळती करून घेण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. एका ग्रामीण भागातील अनुदानित शाळेच्या पालक सभेत विद्यार्थ्यांची टीसी वळती करण्यासंदर्भातील बाब समोर आल्याने या प्रकाराची व्याप्ती आणि त्यामागील यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अँड्रॉइड मोबाईलपासून मोफत प्रवेशापर्यंत आमिषांची चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, काही शाळांकडून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी पालकांशी संपर्क साधला जात असल्याचे सांगितले जाते. यामध्ये अँड्रॉइड मोबाईल, मोफत प्रवेश, पहिल्या वर्षाची फी माफी, गणवेश, पुस्तके, शैक्षणिक साहित्य तसेच स्कूल बस सेवा मोफतदेण्याचे आश्वासन दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना लक्ष्य करून त्यांना विविध प्रकारची प्रलोभने दाखविली जात असल्याचेही बोलले जात आहे. या प्रक्रियेत काही ओळखीच्या व्यक्ती तसेच गावपातळीवर सक्रिय असलेल्या काही मंडळींची भूमिका असल्याची चर्चा असली, तरी या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न

विद्यार्थ्यांना केवळ संख्याबळ वाढविण्यासाठी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत वळविले जात असल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक सातत्यावर होऊ शकतो. परिचित शिक्षक, मित्रपरिवार आणि शैक्षणिक वातावरण सोडून अचानक नवीन शाळेत प्रवेश घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, सुरुवातीला विविध सवलतींचे आश्वासन देऊन प्रवेश मिळविल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षांत पालकांवर वाढीव आर्थिक भार पडतो का, याचीही शिक्षण विभागाने चौकशी करणे गरजेचे असल्याचे पालकांकडून व्यक्त केले जात आहे.

‘टीसी’ वळतीच्या प्रकाराची चौकशी होणार का?

विद्यार्थ्यांची शाळा बदलण्यामागे नेमकी कारणे काय आहेत, पालकांना कोणत्या स्वरूपाची आश्वासने दिली जात आहेत, तसेच कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत वळविण्याचे प्रयत्न होत आहेत का, याची शिक्षण विभागाने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे.

शाळांमधील प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असावी आणि पालकांना कोणत्याही प्रकारच्या दबाव अथवा दिशाभूल करणाऱ्या आमिषांना बळी पडावे लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिक्षण विभागाच्या कारवाईकडे लक्ष

या संपूर्ण प्रकाराची सत्यता तपासण्यासाठी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील शाळांच्या प्रवेश प्रक्रियेची, टीसी वळतीच्या नोंदींची आणि पालकांना देण्यात येणाऱ्या सवलतींची पडताळणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची पळवापळवी अथवा बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश मिळविण्याचे प्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणार का, याकडे आता पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शिक्षण हे सेवाभावी क्षेत्र राहणार की विद्यार्थ्यांच्या संख्येच्या स्पर्धेत त्याचे बाजारीकरण होणार? हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

About The Author

error: Content is protected !!