September 3, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गेवर्धा जि.प. शाळेत शिक्षकांची कमतरता; दोन पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त

“वर्ग ६वी-७वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शाळा व्यवस्थापन समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन”

कुरखेडा, २ सप्टेंबर २०२६ : गेवर्धा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. विशेषतः इयत्ता ६वी व ७वीसाठी आवश्यक असलेली दोन पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

शाळेत सध्या चार शिक्षकांची आवश्यकता असताना नियमितपणे तीन शिक्षक कार्यरत असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीने दिली आहे. शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

या समस्येबाबत ग्रामस्थ व पालकांकडून यापूर्वी प्रशासनाकडे तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारी (BEO) यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.

रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे.

“जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कमतरतेमुळे दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणार का?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ताहीर शेख, उपाध्यक्ष सुषमा ताई इंदुरकर, सदस्य हर्षवर्धन मडावी, देवनाथ कवडो, पौर्णिमाताई कांबळे, निराशाताई वट्टी, दिगंबर कुळमेथे, माधुरीताई नाकतोडे, सारिकाताई गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!