“मूकबधिर नरेंद्रची ‘बोलकी’ कलाकृती… शिल्पकलेतून सजवली आयुष्याची रेखा”
1 min read“गडचिरोली महोत्सवात वेधले लक्ष : आनंदवनात फुलली प्रेमकथा, आधी आई-बाबा, नंतर बांधली लग्नगाठ”
गडचिरोली (प्रतिनिधी) ४ मार्च : तो जन्मत:च मूकबधिर, आदिवासी कुटुंबातील जन्म… कसायला जमीन नाही की राहायला हक्काचे छत… जंगल आणि डोंगरदऱ्या हेच त्याचे जग. मात्र, इच्छाशक्ती एवढी प्रबळ की प्रतिकूल परिस्थितीत त्याने बांबू शिल्पकला अवगत केली. कलाकुसर शिकतानाच एका तरुणीवर जीव जडला, पण प्रेमाचा इजहार करायला वाणीही नव्हती. त्याच्या अबोल भावनांनी तिच्या हृदयाची तार छेडली. मग काय जातीची बंधने झुगारून ते एकत्रित आले अन् शिल्पकलेलाच जगण्याचे साधन बनवून नरेंद्रने आपल्या आयुष्याची रेखा सजवली.
ही गोष्ट आहे कोईनगुडा (ता.भामरागड) येथील नरेंद्र व रेखा मडावी या जोडीची. जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित गडचिरोली महोत्सवात मडावी दाम्पत्यांनी बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनात स्टॉल लावले आहे. या स्टॉलमध्ये दिवा, सूप, फुलदानी, जहाज, टोपली, शिट्टी, पीन, कासव, मंदिर, शंख अशा आकर्षक वस्तू विक्रीला ठेवल्या आहेत. ४२ वर्षीय नरेंद्र मूकबधिर आहे, पण या वस्तू त्याने स्वत:च्या हाताने बनविल्या आहेत. त्याची पत्नी रेखानेही यासाठी त्याला मदत केली आहे.
अतिदुर्गम भागातील डोंगरदऱ्यात सहज मिळणाऱ्या बांबूपासून आकर्षक कलाकृती बनवून प्रशासनाने आयोजित केलेल्या विविध प्रदर्शनात विक्री करून त्यावर उदरनिर्वाह भागविणाऱ्या या जोडीच्या संसाराची मोठी रंजक कहाणी आहे. नरेंद्रने शाळेचे तोंडही पाहिलेले नाही तर रेखाने सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. वरोरा (ता.चंद्रपूर) येथील आनंदवन प्रकल्पात नरेंद्रने हस्तकलेचे प्रशिक्षण घेतले. वरोरा हे रेखाचे आजोळ. ती मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील ताडगव्हाणची. या प्रकल्पातच दोघांची ओळख झाली व पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
हस्तकलेने दिला जगण्याला आकार नरेंद्रला बोलता येत नव्हते, पण रेखावर त्याने जीव ओवाळून टाकला होता. त्यामुळे तिनेही त्याला स्वीकारले. दोघांचीही जात वेगळी,पण आयुष्याची वाटचाल सोबतीने चालण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काही वर्षे ते लिव्ह इनमध्ये राहिले. या दरम्यान त्यांना आशिष (११) व गणेश (६) ही दोन मुले झाली. चार वर्षांपूर्वी नरेंद्र व रेखाने नोंदणी पद्धतीने विवाह केला. आता त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. हस्तकलेतून मिळणाऱ्या चार पैशांवरच मुलांचे शिक्षण व संसाराचा गाडा ते ओढत आहेत.
आरमोरीच्या कलाकृतीचा मुंबई, दिल्लीत डंका
रेखा व नरेंद्र मडावी यांच्या स्टॉललगतच रेखा व प्रभाकर शेलोटे यांचा स्टॉल आहे. वासाळा (ता. आरमोरी) येथील या दाम्पत्याच्या कलाकृतीशिवाय जिल्ह्यातील प्रदर्शनच भरत नाही. दुर्दैवाने प्रभाकर हेदेखील नरेंद्र मडावी यांच्याप्रमाणेच मूकबधिर आहेत. रेखा व प्रभाकर यांचा विवाह संमतीने झालेला आहे. प्रभाकर यांनी सुतारकाम करतानाच हस्तशिल्पकला अवगत केली. पोलिस, वन, कृषी, उमेद यांच्या वतीने आयोजित अनेक प्रदर्शनांत त्यांनी हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तूंची विक्री केली. ‘भारतीय शिल्प हस्तकला’ या नावाने स्वत:चा ब्रँड केला असून मुंबई, दिल्लीतील प्रदर्शनात त्यांच्या वस्तूंनी भुरळ घातली आहे. कार्यालयीन सजावटीच्या वस्तू बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या स्टॉलमध्ये मंत्रालय, कासव, जहाज, कबुतर, राजमुद्रा, रायफल, विमान, तोफ आदींची प्रतिकृती पाहायला मिळाली.
स्वावलंबनाचा मार्ग
पती मूकबधिर असले तरी या सुबक, आकर्षक वस्तू बनविण्याची कला त्यांच्याकडे होती, ही कलाच आमच्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्या कामात मी हातभार लावते, असे रेखा शेलोटे यांनी सांगितले. दोन मुले असून, मोठा धीरज आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी आहे तर धाकटा तुषार हा कार चालवितो. या कलेने स्वावलंबनाचा मार्ग दाखविल्याचे त्या म्हणाल्या.