“सशस्त्र नक्षल्यांचा थरार! पुलाच्या कामावरील तीन वाहने जाळली”
1 min read“रस्ते, पुलाच्या कामाला नक्षल्यांकडून विरोध कायम आहे. हे काम हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील हेडरीजवळ सशस्त्र नक्षल्यांनी २ मार्चरोजी रात्री तीन वाहने जाळून दहशत पसरवली”
गडचिरोली (प्रतिनिधी): ०३ मार्च ; रस्ते, पुलाच्या कामाला नक्षल्यांकडून विरोध कायम आहे. हे काम हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील हेडरीजवळ सशस्त्र नक्षल्यांनी २ मार्चरोजी रात्री तीन वाहने जाळून दहशत पसरवली. यावेळी मजुरांना बेदम मारहाणदेखील केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
हेडरी येथून सात किलोमीटर अंतरावरील पुरसलगोंदीजवळ सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांच्यामार्फत रस्ता व पुलाचे काम सुरू आहे. पुरसलगोंदी – आलेंगा या नदीवर दीड महिन्यापासून सुरू असलेले हे काम नक्षल्यांच्या डोळ्यात खुपत होते. तीन कोटी रुपये खर्च करून पूल उभारणीचे काम रायशी कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतलेले आहे. हे काम प्रगतिपथावर असतानाच २ मार्चरोजी रात्री ८ वाजता दहा नक्षली आले. त्यातील पाच गणवेशात, तर पाचजण सशस्त्र होते. नक्षल्यांनी सर्वात आधी मजुरांकडीलन मोबाईल काढून घेतले. त्यानंतर जेेसीबी, पोकलॅन व सिमेंट टँक अशी तीन वाहने डिझेल टाकून पेटवली आणि मजुरांना बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर हेडरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
वाहनांच्या दुतर्फा रांगा
या घटनेनंतर एटापल्ली – गट्टा मार्गावरील मुख्य रस्ता पोलिसांनी बॅरिकेट टाकून बंद केला. दुपारी १२ वाजेपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी बंद होता. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मजुरांनी दहशतीत काढली रात्र
नक्षल्यांनी सुरुवातीला मजुरांना दाबदडप केली, त्यानंतर मोबाईल हिसकावून घेतले. मात्र, नंतर जाताना मोबाईल परत केले. ते सर्व मराठीत बोलत होते, असे प्रत्यक्षदर्शी मजुरांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मजुरांनी संपूर्ण रात्र नदीकाठी दहशतीत काढली. सकाळी बहुतांश मजूर गावी परतले.