December 22, 2024

“गडचिरोली जिल्ह्यातील खळबळजनक घटना; निकाल विरोधात गेल्याने संतप्त पोलीस निरीक्षकाची चक्क न्यायाधीशालाच शिवीगाळ”; पोलिस निरीक्षक निलंबित

1 min read

गडचिरोली; (प्रतिनिधी); २५ मे : न्यायालयाने आपल्या विरोधात निकाल दिल्याने संतप्त झालेल्या पोलिस निरीक्षक ने न्यायाधीशाच्या बंगल्यावर जाऊन अरेरावी करीत शिवीगाळ करीत धमकी दिली. अशी तक्रार न्यायाधीशाचे वतीने गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल केली असल्याची माहिती आहे. परंतू पोलिसांनी केवळ अरेरावी केली असल्याची फिर्याद नोंदविली असून सदर तक्रार गडचिरोली पोलिसांनी चामोर्शी पोलीस ठाण्याला वर्ग केली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. चामोर्शी चे पोलीस  निरीक्षक राजेश खांडवे असे आरोपीचे नाव असून त्याला या प्रकरणी निलंबित केले आहे. परंतु अद्याप त्याला पोलिसांनी अटक केली नसल्याचे समजते. पोलीस विभाग सदर प्रकरणात कुठलीही माहिती देण्याचे टाळत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीदरम्यान माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी मेश्राम यांनी २० मे रोजी दिले होते.
एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक झाली. त्यापैकी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिलला होती. त्यासाठीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख २० एप्रिल ही होती. त्याच दिवशीच्या पहाटे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व जोड्याने मारहाण केल्याचा आरोप निवडणुकीतील एक उमेदवार आणि सभापती अतुल गण्यारपवार यांनी केला होता. मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली होती. शिवाय तशी तक्रारही गण्यारपवार यांनी केली होती. परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती.

सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम २९४, ३२४, ३२३, ४२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश २० मे रोजी दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पोलिस प्रशासन सत्र न्यायालयात दाद मागण्याचा तयारीत असतानाच पोलीस उपनिरीक्षक राजेश खांडवे हे गुरुवारी पहाटेच्या सुमारास न्यायाधीशाच्या बंगल्यावर गेले आणि न्याधीशांना अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. या घटनेची व्हिडिओग्राफी न्याधीशांच्या बंगल्यावर असलेल्या शिपायाने केली. त्या आधारावर न्याधीशांच्या वतीने गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गडचिरोली पोलिसांनी या संदर्भात कुठलीही माहिती देण्यास नकार देत सदर तक्रार चामोर्शी पोलीस ठाण्याला वर्ग केली असल्याचे सांगितले.

आपल्या विरोधात निकाल गेला म्हणून न्यायाधीशांसोबत अरेरावीची भाषा आणि शिवीगाळ करीत धमकी देण्यापर्यंत मजल मारण्याची हिंमत करीत असेल तर सामान्य माणसाचे काय असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

About The Author

error: Content is protected !!