“गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरातील तलावांमध्ये मत्स्यसंवर्धनास सुरुवात”
1 min read“एस.टी.आर.सी. गोंडवाना विद्यापीठ आणि माफसू यांचा संयुक्त उपक्रम”
गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १६; (गडचिरोली) : कारागृहातील बंद्यांना भविष्यात आर्थिक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य आधारीत प्रशिक्षण देण्याकरीता गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासन प्रयत्नशील आहे.
कारागृहातील बंद्यांसाठी मत्स्यपालन हा व्यवसाय उत्पादन आणि उत्पन्नाचे साधन ठरू शकतो. याअनुषंगाने, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एस.टी.आर.सी.), गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, कारागृह परिसरातील चार तलावांची मत्स्यपालनाकरीता निवड करण्यात आली. या तलावांमध्ये पावसाळी हंगामात मत्स्यबीजांचे संचयन करण्याच्या दृष्टीने 7 जुलै रोजी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी गडचिरोली येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. यावेळी कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते इंडियन मेजर कार्प माशांचे फ्राय आकाराचे 30 हजार मत्स्यबीज तलावांमध्ये सोडण्यात आले.
याप्रसंगी नागपूरचे (माफसू) शिक्षण संचालक डॉ. एस.व्हि. उपाध्ये, अधिष्ठाता (मत्स्य), डॉ. एस.डब्ल्यु. बोंडे, तुरूंग प्राधिकरण गडचिरोलीचे संचालक संजय त्रिपाठी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे, एस.टी.आर.सी.चे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख आशीस घराई, पशुआहार विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अतुल ढोक, ग्रोवेल फीड्सचे साईनाथ चव्हाण, एस.टी.आर.सी.चे वैज्ञानिक अधिकारी अजय शहारे तसेच गोंडवाना विद्यापीठ आणि कारागृह विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन हे उपयुक्त शेतीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्नाकरीता एकात्मिक शेती करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. त्यासोबतच, कुलगुरू डॉ. पाटील यांनी कारागृह विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्याची प्रशंसा केली. तसेच बंद्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना यश मिळेल ही सदिच्छा व्यक्त केली.
कारागृह अधिक्षक कोकाटे यांनी कारागृहातील बंदी शिक्षा भोगून बाहेर प्रवेश केल्यानंतर ते आत्मनिर्भर होण्याकरीता कारागृह प्रशासन राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती कुलगुरू डॉ. पाटील यांना दिली. तदनंतर, कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते इंडियन मेजर कार्प माशांचे फ्राय आकाराचे 30 हजार मत्स्यबिज तलावांमध्ये सोडण्यात आले. मत्स्यबिजांची योग्य वाढ होण्याकरीता मत्स्यबिजांचे खाद्य, पाण्याची गुणवत्ता टिकून राहण्याकरीता औषधी आदी साहीत्य प्रशासनाला पुरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता माफसू संयुक्त प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. प्रशांत तेलवेकर, सह-संशोधक डॉ. राजीव राठोड, एस.टी.आर.सी. गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.