April 25, 2025

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही कर्जेली गाव उपेक्षितच; पावसाळ्यात गावाला बेटाचे स्वरूप, जीव मुठीत ठेवून डोंग्याने करतात नदी पार

“झिमालगट्टा ,देचलीपेठा येथे जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते”

गडचिरोली न्यूज नेटवर्क, ऑगस्ट ०८,(सिरोचा) : कर्जेली गावाला आजही बारमाही रस्त्याची प्रतीक्षा आहे. पावसाळ्यात या गावाला बेटाचे स्वरूप येत असून, जीव मुठीत ठेवून डोंग्याने नदी पार करावी लागते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही कर्जेली गाव उपेक्षितच राहिला आहे.  सिरोंचापासून ६४ कि.मी. अंतरावर असलेल्या रमेशगुडम ग्रामपंचायत अंतर्गत अतिदुर्गम गाव म्हणून कर्जेली या गावाची ओळख आहे. सिरोंचा तालुक्यातील हे शेवटचेच गाव आहे. विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि मोजक्याच लोकांची वस्ती, त्यामुळे आतापर्यंत या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असतांना हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

गावासभोवताल पाण्याचा वेढा असल्याने पाण्यातून छोट्याश्या डोंग्याने मार्ग काढावा लागतो. अतिदुर्गम कर्जली या गावाला जाण्यासाठी बारमाही पक्का रस्ताही झालेला नाही. पावसाळ्यात एका बाजूला रमेशगुडम नाला, दुसऱ्या बाजूला विडरघाट नाला, तिसऱ्या बाजूला इंद्रावती नदी आहे.

पावसाळ्यात गाव पाण्याने वेढलेले असते. गावातून बाहेर जाण्यासाठी नावेने जावे लागते. आजारी लोकांना, गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूरला नेण्यासाठी ही नावेने गावातून बाहेर निघून बैलबंडीने मोठी कसरत करून जावे लागते.

आठवडी बाजारासाठीसुद्धा एकमेव टॅक्सीचा नागरिकांना आधार आहे. या भागात चालणारी एकमेव खासगी टॅक्सी रमेशगुडमवरून चालते. या टॅक्सीने कर्जेलीवासीय तालुक्याला येतात. या गावाला बारमाही रस्ता झाल्यास गावकरी मुख्य प्रवाहात येऊ शकतात. शासनाच्या योजना या गावात कशा पोहोचतात माहीत नाही. अविकसित आणि प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या या गावात विकासाचा चिखलातून मार्ग काढत पावसाच्या दिवसामध्ये नावेतून गावाबाहेर पडावे लागते. बऱ्याचदा अत्यावश्यक काम असल्यास तालुकास्तरावर पोहोचण्यासाठी विलंब होतो. प्रसंगी कुठेही मुक्काम करावा लागतो. दूरसंचार सेवा तर सोडा, वीजपुरवठा एकदा खंडित झाला की पूर्ववत सुरू होण्यासाठी आठवडा लागतो. त्यामुळे या गावाचा तालुक्याशी नेहमीच संपर्क तुटलेला असतो. शासन व प्रशासनाच्या योजना अजूनतरी गावात पोहोचल्या दिसत नाही.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!