September 12, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

झेन्डेपार लोह खानीविरुद्ध कोरचीत बंड: सरपंचांचा संयुक्त राजीनाम्या सह चक्काजामचा इशारा

“झेन्डेपार लोह खान प्रकल्पाविरोधात कोरचीत संताप: सरपंच संघटनेकडून चक्काजाम आंदोलनाचा इशारा”

कोरची, १३ जून : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेन्डेपार लोह खान प्रकल्प तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी सरपंच संघटनेने आज तहसीलदारांना तीव्र शब्दांत निवेदन सादर केले. पेसा कायद्यांतर्गत संरक्षित असलेल्या या अतिसंवेदनशील आदिवासी तालुक्यातील पर्यावरण, वन्यजीव आणि स्थानिक संस्कृतीला प्रकल्पामुळे गंभीर धोका असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ४६.३८ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पाला ३० वर्षांसाठी लीज देण्यात आली असून, यामुळे जंगलाचा नाश, प्रदूषण आणि वन्यजीवांचे लुप्त होण्याचे संकट आहे. बिबट, अस्वल, सांबर, नीलगाय, मोर यांसारखे प्राणी आणि पक्षी कायमचे नष्ट होण्याची भीती आहे. तसेच, मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघात आणि प्रदूषण वाढेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

कोरचीतील ९०% आदिवासी लोकसंख्या जंगलावर अवलंबून आहे. त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथांसाठी जंगलातील संसाधने महत्त्वाची आहेत. मात्र, २०१७ आणि २०२३ मध्ये स्थानिकांच्या अनुपस्थितीत गडचिरोली येथे घेण्यात आलेल्या जनसुनावण्यांमुळे शासनाने पेसा कायद्याचा भंग केल्याचा आरोप आहे. सुरजागड लोह खान प्रकल्पाचा दाखला देत, स्थानिकांची फसवणूक आणि दिशाभूल झाल्याचा दावाही संघटनेने केला.

सरपंच संघटनेने शासनाला आवाहन केले आहे की, प्रकल्प तत्काळ बंद न केल्यास संयुक्त राजीनामा आणि चक्काजाम आंदोलन केले जाईल. या निवेदनामुळे कोरचीत पर्यावरण आणि आदिवासी हक्कांचा मुद्दा पुन्हा तापला असून, शासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

error: Content is protected !!