“कोरची तालुक्यात आढळतात दररोज ५० मलेरिया पॉझिटिव्ह रूग्ण; मलेरियाने मृत्यू होण्याचे सत्र सुरूच”
1 min readकोरची, ऑगस्ट १०; कोरची तालुका दिवसेंदिवस मलेरियाने ग्रस्त होत आहे. या तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात दररोज ५० पेक्षा जास्त मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळत आहेत. रुग्णांवर योग्य उपचार न झाल्यामुळे रुग्ण दगावत आहेत.
विशाल भारत रक्षा (२६) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तरधर्मपाल बळीराम पुजेरी (२५)हा भिमपूर येथील युवक सुद्धा २४ जुलै रोजी मलेरियाने दगावला आहे. प्राप्त माहितीनुसार विशालला बरे वाटत नव्हते. तेव्हा तेथील आशा वर्करनी त्याला मलेरियाचा १८ जुलै ला डोज दिला. नंतर त्याची तब्येत आणखीनच खराब होत असल्याने १९ जुलै ला देवरी येथील डॉ. धुमनखेडे यांचेकडे घेऊन गेले. त्यांनी तपासणी केली असता, मलेरियाने ग्रस्त असल्याचे सांगून त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाने त्याच दिवशी रात्री १२ वाजता गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. २४ जुलै पर्यंत विशाल गोंदिया येथील सामान्य रूग्णालयात दाखल होता. तब्येत आणखीनच बिघडत असल्याने नागपूरला रेफर केले होते. पण प्रकृती गंभीर दिसल्याने कुटूंबियांनी त्याला नागपूर येथीलच बेहेकार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अखेर त्याचा मृत्यू झाला.
यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल इथून ४ किमी अंतरावर असलेल्या एडजाल येथील शिवांगी कैलाश नैताम (४) हिचा दि. २१ जुलै रोजी मलेरियाने मृत्यू झाला. त्यापुर्वी याच केंद्राअंतर्गत गोडरी येथील प्रमोद अनिल नैताम (६), त्याची बहीण करिश्मा अनिल नैताम (८) यांचा १० मार्च रोजी मलेरियाने मृत्यू झाला. त्याआधी आलोंडी येथील आरती कुंजाम या दिड महिन्याच्या बाळाचा दि. ३ जुनला मलेरिया ने मृत्यूझाला होता. वाको येथील बाली भुवन गंगासागर या दिड महिन्याच्या मुलीचाही मृत्यू झाला होता.
मलेरियाच्या मृत्यूनंतर जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी तीनदा कोटगुल परिसरात जाऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि तालुक्यात माता- बाल मृत्यू आणि मलेरियाने मृत्यू रोखण्यासाठी न तालुक्यातील आरोग्य विभागाला सूचना केल्या. पण तालुक्यातील आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कसल्याही प्रकारची सुधारणा केली नाही. कोरची तालुक्यात कोटगुल आणि बोटेकसा या दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या तालुक्यात मानसेवी डॉक्टर आणि सीएचओ डॉक्टर मोठ्या प्रमाणात असून आरोग्य वर्धीनी या ठिकाणी काम करताना दाखविण्यात येते. परंतु जेव्हा जेव्हा प्रतिनिधी या केंद्रांना भेटी देतात तेव्हा हे डॉक्टर मिळत नाही. महिन्याकाठी एखाद्या दिवशी हे डॉक्टर येतात असे गावकरी सांगतात.