नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1 min readगडचिरोली, 1 जानेवारी : नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेवून आला असून विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. लॉईडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6200 कोटींची गुंतवणूक होत असून, चार हजारावर रोजगारनिर्मिती होते आहे.
आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट ताडगुडा ब्रीज येथे गेले. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे त्यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे त्यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. हा परिसर अतिदुर्गम व नक्षलप्रभावीत मानला जातो. थेट मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी जात एक वेगळा संदेश दिला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.
त्यानंतर दुपारी कोनसरी येथे, लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यात कोनसरी येथे डीआयआय प्लांट (400 कोटी रुपये गुंतवणूक, 700 रोजगार), पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (3000 कोटी रुपये गुंतवणूक, 1000 रोजगार), हेडरी, एटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (2700 कोटी रुपये गुंतवणूक, 1500 रोजगार), वन्या गारमेंट युनिट (20 कोटी रुपये गुंतवणूक, 600 रोजगार) याचा समावेश आहे. शिवाय लॉईडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉईडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सुमारे 1200 विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने, जिमखाना, बालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण करण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे शेअर्स प्रदान करुन एकप्रकारे मालकी देण्याचाही स्तुत्य उपक्रम लॉईड्सने हाती घेतला. हे शेअर्स मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
गडचिरोलीत ग्रीन माईनिंगचाही शुभारंभ करण्यात आला. यातून खाणींचे संरक्षण होणार असून लोहखनिजासाठी स्लरी पाईपलाईनमुळे इंधनबचत होणार, कार्बन उर्त्सजन कमी होणार, रस्त्यावरील अपघातही कमी होणार आहेत. ग्रीन माईनिंगचा प्रयोग देशातून गडचिरोलीत प्रथमच राबविण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी एक करार करणार असून, त्यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. यातून गडचिरोलीतील तरुणांनाच रोजगार मिळणार आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.