गडचिरोलीत 11 जहाल नक्षलींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
1 min readगडचिरोली, १ जानेवारी : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात 8 महिला आणि 3 पुरुष आहेत. यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते.
छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षिस जाहीर केले होते. यात दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहेत. 34 वर्षांपासून त्या नक्षली चळवळीत आहेत. 3 डिव्हिजन किमिटी मेंबर तर 1 उपकमांडर, 2 एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी 86 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात 5 नक्षली ठार झाले. 2024 या वर्षांत 24 नक्षली ठार झाले आणि 18 माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या 6 महिन्यात 16 जहाल नक्षलवादी आणि आज 11 असे 27 जण मुख्य प्रवाहात आले आहेत. पोलीस दलाच्या प्रयत्नामुळे सातत्याने मावोवादींचे आत्मसमर्पण सुरू असून यामुळे माओवादाची कंबर तोडण्याचं काम होत असल्याचे ते म्हणाले.
उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या 4 वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादात सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. 11 गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. सी-60 च्या जवानांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाही, ही आनंदाची बाब आहे. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलीचे लोकार्पण करण्याचे आले तसेच येथील पोलीस दलाच्या नूतन हेलिकॉप्टर हॅंगर चे उद्घाटनही करण्यात आले. तसेच विविध नक्षल चकमकीमध्ये शौर्य दाखविणाऱ्या सी-60 च्या पोलीस जवानांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ.मिलिंद नरोटे, पद्मश्री पुर्णामासी जानी, पद्मश्री परशूराम खूणे, लॉईड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन प्रामुख्याने उपस्थित होते.
000