धानाच्या ढिगात करोडोंची लूट: देऊळगावचा १.५३ कोटींचा घोटाळा बाहेर!

गडचिरोली; ८ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या देऊळगाव खरेदी केंद्रावर धान आणि बारदाना खरेदीत १ कोटी ५३ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी या प्रकरणी संबंधित केंद्राच्या अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून, लवकरच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या घोटाळ्याने पुन्हा एकदा गडचिरोलीतील धान खरेदी हंगामातील भ्रष्टाचार चर्चेत आला आहे.
सूत्रांनुसार, प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी काही दिवसांपूर्वी देऊळगाव खरेदी केंद्राला भेट दिली. २०२३–२४ हंगामातील धान आणि बारदाना खरेदीच्या नोंदी तपासताना त्यांना संशयास्पद बाबी आढळल्या. त्यांनी तात्काळ चौकशी समिती नेमून तपास सुरू केला. तपासात कागदावर नोंद असलेल्या १९,८६० क्विंटल धानापैकी ३,९४४ क्विंटल धान आणि ४९,७५१ बारदान्यां पैकी १४,१४८ बारदाने गायब असल्याचे उघड झाले. इतकेच नव्हे, तर भरडाईसाठी पाठवलेल्या एका बारदान्यात ४० किलो ऐवजी ३०किलो धान भरण्यात आल्याचेही समोर आले. या सर्व गैरव्यवहारातून १ कोटी ५३ लाखांचा अपहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गडचिरोलीत धान खरेदी घोटाळे नवीन नाहीत. मागील वर्षी तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना याच प्रकारच्या घोटाळ्या प्रकरणी अटक झाली होती. यंदाही कुरखेडा कार्यालयांतर्गत देऊळगाव केंद्रावर असाच प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या हंगाम २०२४–२५ च्या खरेदीचीही चौकशी सुरू असून, याघोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गडचिरोलीच्या धान घोटाळ्यावरून वादळी चर्चा झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाच हा नवा घोटाळा समोर आल्याने कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालय संशयाच्या फेऱ्यात सापडले आहे. स्थानिकांमध्ये चर्चा आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय खरेदी केंद्राचे पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करू शकत नाहीत. एका अधिकाऱ्याने राईस मिल धारकांकडून कोट्यवधींची वसुली केल्याचीही कुजबुज आहे, ज्या मुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी या घोटाळ्याला दुजोरा देत सांगितले, “प्रथमदर्शनी गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधितांना नोटीस बजावून खुलासा मागितला असून, दोषींवर कठोर कारवाई होईल.” दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत.
या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. “आम्ही धान विकतो, पण पैसे वेळेवर मिळत नाहीत. हा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातो?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाल्यासच शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सध्या देऊळगाव केंद्राच्या अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. चौकशी समितीचा अहवाल आणि कायदेशीर कारवाईनंतरच या घोटाळ्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. तो पर्यंत गडचिरोलीतील धान खरेदी घोटाळ्याची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.