महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच: गडचिरोलीत आयुर्वेद पदवीधरांचे ऐतिहासिक जिल्हास्तरीय महासंमेलन

गडचिरोली, १४ एप्रिल: गडचिरोलीत प्रथमच आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय आयुर्वेद (बी.ए.एम.एस.) पदवीधर महासंमेलन रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी धानोरा रोडवरील “महाराजा सेलिब्रेशन” सभागृहात दोन सत्रांमध्ये यशस्वीपणे पार पडले. आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ, पदवीधर, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हे संमेलन ऐतिहासिक ठरले. गडचिरोली सारख्या ग्रामीण आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात अशा स्वरूपाचा उपक्रम प्रथमच राबवला गेल्याने याला विशेष महत्त्वप्राप्त झाले आहे.
पहिले सत्र: उद्घाटन आणि प्रेरणादायी सुरुवात:
सकाळी १० वाजता उद्घाटन सत्राला सुरुवात झाली. गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. डॉ. नामदेवरावजी किरसान यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून आयुर्वेदाच्या प्रसाराचे महत्त्व अधोरेखित केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आयुर्वेद पदवीधर डॉ. बी.एस. झोटिंग होते. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी कीलनाके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम आणि ज्येष्ठ आयुर्वेद पदवीधर डॉ. वृषाली अप्पलवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अविनाश शंखदरवार यांनी केले. त्यांनी गडचिरोलीत आयुर्वेदाच्या प्रचार–प्रसारासाठी संमेलनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सूत्रसंचालन डॉ. संजय सुपारे आणि डॉ. मीनाक्षी बनसोड यांनी अतिशय प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन मुख्य आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन कामडी यांनी केले.
या सत्रात आयुर्वेदाच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडण्यावर भर देण्यात आला. गडचिरोलीच्या आदिवासी भागात स्थानिक औषधी वनस्पतींचा उपयोग आणि त्यांचे संवर्धन यावर चर्चा झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आयुर्वेदाला गाव पातळीवर नेण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रोत्साहन दिले. गडचिरोली जिल्ह्यात सेवानिवृत्त झालेल्या आणि प्रशासकीय सेवेत उच्च पदस्थ असलेल्या आयुर्वेद पदवीधरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दुसरे सत्र: तांत्रिक चर्चा आणि करिअर मार्गदर्शन
दुपारच्या सत्रात उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य निमाचे अध्यक्ष डॉ. राजू ताटेवार उपस्थित होते. सत्राच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली निमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश शंखदरवार होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य निमाचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश हातगावकर, डॉ. नितीन कोथळे, डॉ. प्रवीण राखुंडे, डॉ. अमोल दिवाने, गडचिरोली निमाचे सचिव डॉ. सचिन कामडी आणि कोषाध्यक्ष डॉ. सौरभ नागुलवार यांनी उपस्थिती लावली.
या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. सौरभ कन्नाके आणि डॉ. तृप्ती मावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अस्मिता देवगडे यांनी केले. सत्रात आयुर्वेदातील प्रगत उपचार पद्धती, संशोधन आणि करिअरच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली. स्थानिक वैद्यांनी आदिवासी औषधी वनस्पतींवर आधारित उपचार पद्धतींची प्रात्यक्षिके सादर केली. या शिवाय, आयुर्वेदाला डिजिटल माध्यमातून लोकप्रिय करण्यासाठी तरुण पदवीधरांना प्रोत्साहन देण्यात आले.
समारोप: मेडिको–लीगल सेशन आणि सांस्कृतिक रंग
संमेलनाचा समारोप सायंकाळी ६ वाजता झाला. समारोपिय सत्रात मेडिको–लीगल सेशन आयोजित करण्यात आले, ज्या मध्ये आयुर्वेदिक वैद्यांना कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचे मन जिंकले. स्थानिक आदिवासी कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्य आणि संगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य आयोजन समितीचे सदस्य डॉ. हेमराज मसराम, डॉ. नितीन मसराम, डॉ. चेतन निकोडे, डॉ. प्रदीप लाड, डॉ. मयूर चन्नावार, डॉ. प्रदीप मडावी, डॉ. स्वाती कामडी, डॉ. यज्ञश्री झरकर, डॉ. स्नेहल मेश्राम, डॉ. अश्विनी आभारे, डॉ. मनोहर मडावी, डॉ. नारायण करेवार, डॉ. ज्ञानेश्वर सिरसाम आणि डॉ. सचिन मडावी यांनी अथक परिश्रम घेतले. सर्व नियोजन समिती सदस्यांचे उत्तम सहकार्य लाभल्याने हा उपक्रम यशस्वी झाला.
या संमेलनाने गडचिरोलीत आयुर्वेदाच्या प्रचार–प्रसाराला चालना दिली. स्थानिक तरुणांमध्ये आयुर्वेदाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, आदिवासी औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी नवे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. संमेलनात सहभागी झालेल्या पदवीधरांनी आयुर्वेदाला ग्रामीण भागात पोहोचवण्याचा संकल्प केला.
आयोजकांनी पुढील वर्षी आणखी भव्य स्वरूपात संमेलन आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला. गडचिरोली आयुर्वेद असोसिएशन आणि स्थानिक बी.ए.एम.एस. पदवीधर संघटनेने आयोजित केलेल्या या संमेलनाने आयुर्वेद क्षेत्रात नवे पर्व सुरू केलेआहे. “आयुर्वेद: गडचिरोलीपासून विश्वापर्यंत” हा संदेश या संमेलनाने सर्वदूर पोहोचवला.