April 25, 2025

शिक्षण क्षेत्रातील महाघोटाळा उघड! बनावट शालार्थ आयडी द्वारे कोट्यवधींची लूट, उपसंचालकासह अनेकांना अटक

नागपूर, १४ एप्रिल: शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा कळस गाठणारा एक सनसनाटी घोटाळा समोर आला आहे. बनावट शालार्थ आयडीच्या आधारे 580 हून अधिक प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे वेतन अदा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोली येथून अटक करण्यात आली आहे. याशिवाय, बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपद मिळवणाऱ्या पराग पुडके यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हा घोटाळा 2019 पासून सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. सदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेची कोणतीही शहानिशा करता बनावट शालार्थ आयडी तयार करून अनेक अपात्र व्यक्तींना वेतन अदा करण्यात आले. यातील एका गंभीर प्रकरणात पराग पुडके याने शिक्षकाचा कोणताही अनुभव नसताना नागपूर येथील एस.के.बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून पुडके याला जेवताळा (ता. लाखनी, जि. भंडारा) येथील विद्यालयात मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली

या प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र झाला असून, सायबर पोलिसांनीही यात सहभाग घेतला आहे. बनावट शालार्थ आयडी संगणकाद्वारे कशा पद्धतीने तयार करण्यात आल्या, यात कोणकोण सहभागी होते आणि बनावट कागदपत्रांचा स्रोत काय होता, याचा शोध सायबर पोलिस घेत आहेत. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील तीन कर्मचारीनिलेश मेश्राम (अधिक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग), संजय दुधाळकर (शिक्षण उपनिरीक्षक), आणि सुरज नाईक (वरिष्ठ लिपीक)—यांचाही या घोटाळ्यात थेट सहभाग आहे. त्यांच्यावर IPC कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट कागदपत्रे), 468 (फसवणुकीसाठी बनावट), 471 (खोटे दस्तऐवज) आणि 472 अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

या घोटाळ्याने शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे विदारक वास्तव उघड केले आहे. स्थानिक पातळीवरून ते वरिष्ठ कार्यालयांपर्यंत पसरलेल्या या कटात अनेक बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सायबर पोलिसांनी बनावटशालार्थ आयडी तयार करणाऱ्या टोळीचा माग काढण्यास सुरुवात केली असून, याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

स्थानिक नागरिक आणि शिक्षक संघटनांनी या घोटाळ्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात अशाप्रकारच्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली असून, सरकार आणि शिक्षण विभाग या प्रकरणी कोणती पावले उलटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे. हा घोटाळा केवळ आर्थिक फसवणुकी पुरता मर्यादित नसून, शिक्षण व्यवस्थेतील विश्वासाला तडा देणारा ठरला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!