विसोरा येथील गर्भवती महिलेचा मृत्यू: आरोग्य उपकेंद्रातील हलगर्जीपणाने बळी घेतला माय-लेकाचा!

गडचिरोली, १६ एप्रिल : देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरला आहे. आदिवासी समाजातील गर्भवती महिला मनिषा शत्रुघ्न धुर्वे (वय ३१) आणि तिच्या गर्भातील अर्भकाचा डॉक्टर आणि परिचारिकेच्या घोर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी आणि स्थानिकांनी देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलनाचा पवित्रा घेत दोषींवर कठोरकारवाईची मागणी केली आहे. “दोषींना निलंबित करेपर्यंत मृतदेह हलवणार नाही,” अशी आक्रमक भूमिका घेतल्याने परिसरात तणाव पसरला आहे.
१२ तासांचा जीवघेणा विलंब
१३ एप्रिल २०२५ रोजी मनिषा धुर्वे हिला प्रसूतीसाठी विसोरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तपासणी नंतरही तिची प्रसूती होत नसल्याने कुटुंबीयांनी तातडीने देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकाबोलावली. मात्र, उपकेंद्रातील डॉ. गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी “थोडा वेळ थांबा, प्रसूती येथेच होईल” असे खोटे आश्वासन देत रुग्णवाहिका परत पाठवली. तब्बल १२ तास उलटूनही मनिषाची प्रसूती न झाल्याने तिची प्रकृती खालावली. अखेरीस तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथेही डॉक्टरांनी “प्रसूती होईल” असे सांगत वेळ काढला. शेवटी १४ एप्रिलच्या संध्याकाळी मनिषाला ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी मनिषा आणि तिच्या गर्भातील बाळाला मृत घोषित केले.
आंदोलनाने तणाव, कारवाईला वेग
या अमानुष घटनेने विसोरा गाव पेटून उठले. मनिषाच्या कुटुंबीयांनी आणि काही राजकीय नेत्यांनी देसाईगंज येथील ग्रामीणरुग्णालया समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. “हलगर्जीपणाने माय–लेकाचा जीव घेणाऱ्या डॉक्टरांना तात्काळ निलंबित करा,” अशी मागणी करत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी तात्काळ पावले उचलत संबंधित कंत्राटी डॉक्टर आणि परिचारिकेची सेवा समाप्तीचे आदेश जारी केले. याशिवाय, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईल,” असे डॉ. शिंदे यांनी जाहीर केले.
आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
ही घटना विसोरा येथील पहिलीच नाही. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा अभाव आणि निष्काळजी पणाच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. “प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पुरेसे साधनसामग्री आणि प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. आमच्या बायकांचे आणि मुलांचे जीव असेच धोक्यात जाणार का?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. मनिषाच्या मृत्यूने पुन्हा एकदा ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पोलखोल झाली आहे.
या प्रकरणाने गडचिरोलीच्या आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चौकशी समितीचा अहवाल काय सांगतो आणि दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मनिषाच्या मृत्यूने निर्माण केलेली चीड आणि असंतोष लवकर शमण्याची शक्यता नाही. “आमच्या बहिणीला आणि तिच्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी लावून धरली आहे.