April 25, 2025

धानोरा तहसीलदाराची काळी कृत्ये उघड! पत्नीला मारहाण, पिस्तूल रोखले; जादूटोण्याचा प्रयत्न, नांदेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गडचिरोली,१६ एप्रिल : धानोऱ्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या अविनाश श्रीराम शेंबटवाड (वय ३४) यांच्या काळ्या कृत्यांनी एकच खळबळ उडाली आहे. मूलबाळ होत नाही म्हणून पत्नीला शारीरिकमानसिक छळ करणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल रोखण्यापर्यंत त्यांची मजल गेली. एवढेच नव्हे, तर मूलबाळासाठी जादूटोण्यासारख्या अघोरी प्रथांचा आधार घेतल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर आहे. नांदेड पोलिसांनी १३ एप्रिल २०२५ रोजी अविनाश यांना अटक करत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले अविनाश शेंबटवाड हे सध्या गडचिरोलीच्या धानोरा तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. दीड वर्षांपूर्वी नांदेडच्या मगनपुरा भागातील एका युवतीशी त्यांचा थाटामाटात विवाह झाला. लग्नात माहेरकडून सोने, साहित्य आणि मानपान देण्यात आले. मात्र, लग्नानंतर अविनाश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पत्नीला छळण्यास सुरुवात केली. कर्तव्याच्या ठिकाणी पत्नी सोबत असताना काही ना काही कारण काढून मारहाण केली गेली. इतकेच नव्हे, तर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकीही दिली, असा धक्कादायक दावा पत्नीने केला आहे.

जादूटोण्याचा अघोरी प्रयत्न

पत्नीच्या मते, मूलबाळ होत नसल्याने सासरकडील त्रास वाढला. ती सासरी असताना मूलबाळासाठी जादूटोण्या सारख्या अंधश्रद्धापूर्ण प्रथांचा वापर करण्यात आला. त्रास असह्य झाल्याने ती नांदेडला माहेरी परतली. तिथे तिने शिवाजीनगर पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ११ मार्च २०२५ रोजी अविनाश यांच्यासह त्यांच्या आई, वडील आणि डॉक्टर असलेल्या दोन भावांविरुद्ध कौटुंबिक छळ, अनिष्ठ प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांची कारवाई

अविनाश नांदेडात असल्याची खबर मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी १३ एप्रिल रोजी त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्या नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे करत आहेत.

एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने अशा प्रकारे कायद्याची पायमल्ली केल्याने गडचिरोली आणि नांदेड परिसरात संतापाची लाट उसळली आहे. समाजात आदर्श घालणाऱ्या तहसीलदारासारख्या व्यक्तीकडून अंधश्रद्धा आणि हिंसाचारासारखी कृत्ये घडावीत, यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!