गडचिरोलीत गौण वन उपजांद्वारे स्वयंरोजगाराला चालना: सृष्टी संस्थेची यशस्वी कार्यशाळा

गडचिरोली , २१ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क क्षेत्रातील गौण वन उपजांचा (Minor Forest Produce – MFP) उपयोग करून ग्रामीण आणि आदिवासी भागात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नागपूर येथे सृष्टी संस्थेने नैसर्गिक संसाधनावर हक्क प्रकल्पांतर्गत एक कार्यशाळा आयोजित केली. वडसा आणि कुरखेडा तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले. “अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम, २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२” अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून गावातील जंगलातील तेंदूपत्ता, बांबू, मध, मोहफूल, शतावरी, बेहडा, हिरडा, जांभूळ, सिताफळ, डिंक, लाख यांसारख्या गौण वन उपजांपासून उत्पादने तयार करून स्थानिक स्तरावर व्यवसाय कसा उभारता येईल, यावर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.
सृष्टी संस्थेचे संयोजक केशव गुरनुले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला आर्थिक सहयोगी संस्था स्विसेड आणि कल्याण टांकसाळे यांचे सहकार्य लाभले. पुण्यातील फ्लेम युनिव्हर्सिटीचे डॉ. भरत दमानी यांनी ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि व्यवसाय मॉडेल्स यावर तज्ज्ञ मार्गदर्शन केले. कार्यशाळेत गाव पातळीवरील गौण वन उपजांची यादी आणि चार्ट तयार करण्यावर भर देण्यात आला. यामुळे कच्च्या मालाची उपलब्धता आणि त्याचे प्रमाण निश्चित झाले. तसेच, या उपजांवर प्रक्रिया करून मधापासून सेंद्रिय मध, मोहफुलां पासून जॅम, बांबू पासून हस्तकला वस्तू यांसारखी उत्पादने तयार करण्याच्या संधींवर चर्चा झाली.
सहभागी ग्रामसभा प्रतिनिधींना गटांमध्ये विभागून कृती प्रशिक्षण देण्यात आले. यात उत्पादन निर्मिती, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि स्थानिक तसेच तालुका स्तरावरील बाजारपेठेत विक्रीसाठी धोरणे ठरवण्यात आली. ग्रामीण आणि आदिवासी युवक–युवतींना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे प्रेरित करण्यासाठी व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले. “आमच्या गावात नैसर्गिक संपत्ती विपुल आहे, पण त्याचा योग्य वापर कसा करावा हे आम्हाला माहीत नव्हते. या कार्यशाळेने नवीन दिशा दिली,” असे वडसा तालुक्यातील एका प्रतिनिधीने सांगितले.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि आदिवासी समाजाला आर्थिक स्थायित्व व सशक्तीकरण प्रदान करणे हा होता. केशव गुरनुले म्हणाले, “गाव पातळीवर स्वयंरोजगाराचे मॉडेल विकसित करून त्याला बाजारपेठेशी जोडणे हा आमचा उद्देश आहे.” स्विसेडच्या सहयोगाने आणि डॉ. दमानी यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम यशस्वी झाला.
कार्यशाळेनंतर गाव स्तरावर गौण वन उपज संकलन आणि प्रक्रियेसाठी छोटे प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. स्थानिक युवक–युवतींना उत्पादन निर्मिती आणि विपणनासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल. सृष्टी संस्था आणि स्विसेड यांच्या मार्फत उत्पादनांना बाजारपेठेत स्थान मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. हा उपक्रम गडचिरोलीतील आदिवासी समाजाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.