अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी गडचिरोली प्रशासन सज्ज : कठोर कारवाईचे निर्देश

गडचिरोली, 29 एप्रिल : अक्षयतृतीया हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असून, या शुभदिनी विवाहांचे प्रमाण वाढते. मात्र, याच मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार यंदा बालविवाह रोखण्यासाठी विशेष ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. बालविवाहात सहभागी होणाऱ्या किंवा सहकार्य करणाऱ्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजना केल्या आहेत. ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकाऱ्यांना, तर शहरी भागात बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय, विवाह समारंभांशी संबंधित धार्मिक गुरू, पंडित, मंडप मालक, छायाचित्रकार, केटरिंग व्यावसायिक, लॉन मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. प्रशासनाने या सर्व घटकांना बालविवाहाला प्रोत्साहन देणे किंवा सहभागी होणे टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानाही बालविवाहाच्या घटना घडल्यास संबंधितांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत कठोर कारवाई होईल.
अक्षयतृतीया हा विवाहासाठी अत्यंत शुभ मानला जाणारा दिवस आहे. यामुळे या दिवशी बालविवाह होण्याची शक्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना बालविवाहाची माहिती तातडीने कळवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 आणि आपत्कालीन क्रमांक 112 उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे, जेणेकरून नागरिक नि:संकोचपणे माहिती देऊ शकतील.
गडचिरोली जिल्ह्यात मागील सहा वर्षांत 17 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. राज्य पातळीवर गेल्या काही वर्षांत 5,421 बालविवाह थांबवण्यात आले असून, यापैकी 401 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 16 (1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली. यंदा अक्षयतृतीयेच्या निमित्ताने बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक कडक पावले उचलली आहेत. यामध्ये गावागावांत जनजागृती, समुपदेशन आणि सक्तीने कारवाई यांचा समावेश आहे.
बालविवाहाच्या प्रथेला मूळापासून उखडून टाकण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होतो. यामुळे समाजातील प्रत्येकाने बालविवाहाविरोधात एकजुटीने लढण्याची गरज आहे. गडचिरोली प्रशासनाच्या या कठोर पावलांमुळे यंदा अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर बालविवाहाच्या घटनांना आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी सजग राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.