April 30, 2025

निसर्ग, पर्यटन आणि शेतकरी कल्याण: गडचिरोलीसाठी जयस्वाल यांचा दूरदृष्टी प्लॅन

  • गुरवाडा, मार्कंडा येथे इको-टुरिझम विकसित करा
  • फर्निचर निर्मितीद्वारे वनमहसूल वाढवण्यावर भर
  • हत्ती-वाघ नुकसानीसाठी संवेदनशील कारवाईचे निर्देश

गडचिरोली, ३० एप्रिल  : गडचिरोलीच्या नैसर्गिक सौंदर्याला आणि पर्यटनक्षमतेला उजाळा देण्यासाठी वनपर्यटन विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, विधि व न्याय राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. मुख्य वनसंरक्षक कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी वनविभागाच्या कामांचा आढावा घेताना गुरवाडा आणि मार्कंडा येथे आकर्षक प्रवेशद्वार, सेल्फी पॉइंट, इको-फ्रेंडली निवास, हिरवळ, वन्यजीव पुस्तकालय आणि पक्षी माहिती फलकांसह पर्यावरणपूरक सुविधा विकसित करण्याचे आदेश दिले. स्वच्छतेला प्राधान्य देण्याचेही त्यांनी आवाहन केले.

जिल्ह्याने २०२३-२४ मध्ये ४७० कोटी आणि २०२४-२५ मध्ये २१० कोटी रुपयांचा वनमहसूल कमावला, जो राज्यात सर्वाधिक आहे. लाकडाच्या थेट विक्री ऐवजी फर्निचर निर्मितीवर भर देऊन महसूल वाढवण्याची सूचना जयस्वाल यांनी केली, यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

रानटी हत्ती आणि वाघ-मानव संघर्षामुळे होणाऱ्या नुकसानीवरही चर्चा झाली. हत्ती नुकसानीची भरपाई वाढवण्यासाठी शासन निर्णयात सुधारणा प्रस्तावित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शेतकरी गजानन डोंगरवार यांच्या हत्ती नुकसानीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, एका तासात कारवाईचे आदेश देत वनविभागाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून तात्काळ शासकीय मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

मागील वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून वनविभागाने ३२.४६ कोटी रुपये खर्च केले असून, त्याची तपासणी होईल, असे जयस्वाल यांनी सांगितले. मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली. बैठकीला उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पूनम पाटे, संजय मीना, राहुल टोलीया आणि वरून बी.आर. उपस्थित होते.

गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देणारी ही पावले पर्यटन, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला.”

About The Author

You may have missed

error: Content is protected !!