अल्पसंख्यांक दर्जाचा दुरुपयोग: गडचिरोली-चंद्रपूरमधील शाळांमधील भ्रष्टाचाराचा काळा कारनामा!

गडचिरोली/चंद्रपूर, २ मे : महाराष्ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील विश्वशांती विद्यालयांमध्ये कोट्यवधींचा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला आहे. भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली अंतर्गत चालणाऱ्या या शाळांवर बेकायदेशीर नियुक्त्या, बोगस अल्पसंख्यांक दर्जाचा गैरवापर आणि सायकल वाटपात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवली असून, तातडीने चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
काय आहे प्रकरण?
कुनघाडा (रै), भेंडाळा (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली), सावली आणि मारोडा (जि. चंद्रपूर) येथील विश्वशांती विद्यालयांमध्ये २०२३ मध्ये ४०-५० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर नियुक्त्या झाल्याचा दावा आहे. प्रत्येक नियुक्तीसाठी ७०-८० लाख रुपये आणि शालार्थ आयडी मंजुरीसाठी अतिरिक्त १० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. संस्था अध्यक्ष संदीप गड्डमवार आणि सावली येथील मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहारांद्वारे हा घोटाळा घडवल्याचा संशय आहे.
बोगस अल्पसंख्यांक दर्जाचा गैरफायदा
शासनाने २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी घातली असताना, या शाळांनी भाषिक अल्पसंख्यांक दर्जाचा दुरुपयोग करून नियम धाब्यावर बसवले. गडचिरोली जिल्ह्यात ५० हून अधिक अल्पसंख्यांक शाळांची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते, ज्यामुळे लाखो रुपये घेऊन नियुक्त्या करण्याचा मार्ग मोकळा झाला.
मुख्याध्यापक नियुक्तीतही गैरप्रकार
सावली येथील रवींद्र मुप्पावार यांना १२ सेवाज्येष्ठ शिक्षकांना डावलून बेकायदेशीरपणे मुख्याध्यापकपदी नियुक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे, कुनघाडा येथे सुधाकर मेश्राम यांना १५ शिक्षकांना बाजूला सारून मुख्याध्यापक बनवल्याचा आरोप आहे. या नियुक्त्यांसाठी कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न पाळल्याचा दावा आहे.
इंग्रजी शिक्षक नियुक्ती घोटाळा
सावली येथील शाळेत १९९५ पासून इंग्रजी शिकवणारे अरुण राऊत कार्यरत असताना, संस्था अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांनी आपल्या नातेवाईक प्रसन्ना राणी अल्लोरवार यांची बेकायदेशीरपणे नियुक्ती केली. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना वेतन दिले जात असून, यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा संशय आहे.
सायकल वाटपात भ्रष्टाचार
२०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये मुलींसाठी सायकल वाटप योजनेतही गडबड झाल्याचा आरोप आहे. सायकलींच्या खरेदीत भ्रष्टाचार करून मुलींना वाटप न करता परस्पर व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत मुलींच्या यादीची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
चौकशी आणि कारवाईची मागणी
या प्रकरणात गडचिरोली आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नागपूर विभागातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, या प्रकरणातही अशाच कारवाईची अपेक्षा आहे. तक्रारकर्ते कैलास जनार्धन बगमारे यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
“हा घोटाळा गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला तडा देणारा आहे. संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांनी मिळून शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधींची लूट केल्याचा आरोप जनतेत संताप निर्माण करत आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.”