आलापल्लीत वनविभागाची मोठी कारवाई: अवैध अतिक्रमण आणि गुन्हेगारीवर चाप

अहेरी, 2 मे : आलापल्ली वनपरीक्षेत्रात वनविभागाने शासकीय निवास्थानांवरील अवैध कब्जा आणि वनजमिनीवरील अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई केली आहे. 26 एप्रिल 2025 रोजी वनविभागाने अतिक्रमणधारकांना कब्जा रिकामा करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. यानंतर, 29 एप्रिल 2025 रोजी पोलिसांनी वनविभागाच्या निवास्थानातून सात लाख रुपयांचे सुगंधित तंबाकू आणि पानमसाले जप्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
या पार्श्वभूमीवर, 1 मे 2025 रोजी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आलापल्ली वनपरीक्षेत्रातील रिकाम्या शासकीय निवास्थानांची झाडाझडती घेतली. यावेळी लावारिस वस्तू, कबाड आणि जप्त केलेले गुन्हेगारी साहित्य ताब्यात घेऊन पंचनामा नोंदवण्यात आला. तसेच, वनजमिनीवर अवैधपणे ठेवलेली खाजगी वाहने, हायड्रा आणि जेसीबी यंत्रे हटवण्याची कारवाई करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक आणि उपविभागीय अधिकारी, आलापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र आलापल्लीच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली. वनविभागाच्या या कठोर पावलांमुळे अवैध अतिक्रमण आणि गुन्हेगारी कारवायांना चाप बसण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनीही वनविभागाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.
“वनजमिनीचे संरक्षण आणि शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग रोखणे हे आमचे प्राधान्य आहे,” असे वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.