अमृत आहार अंगणवाडी स्वयंपाकी महिलांचे मानधन थकित: ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तीव्र आंदोलनाचा इशारा

कुरखेडा, गडचिरोली (प्रतिनिधी), ५ मे : गडचिरोली जिल्ह्यातील अमृत आहार अंगणवाडी स्वयंपाकी महिलांना मिळणारे अल्प मानधन गेल्या वर्षभरापासून थकित आहे. ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे या महिलांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात तत्काळ थकित मानधन देण्याची मागणी करत अमृत आहार अंगणवाडी स्वयंपाकी महिला संगठनच्या जिल्हाध्यक्षा कृष्णा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
महिलांचे गंभीर आरोप
अमृत आहार योजने अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी महिलांना मिळणारे 1000 रुपये मासिक मानधन अत्यल्प असून, तेही नियमित मिळत नाही. काही महिलांचे 6 महिने, 8 महिने, तर काहींचे तब्बल 15 महिन्यांचे मानधन थकित आहे. कमला कुमरे (रा. भीमपूर, ता. कोरची) यांनी सांगितले की, “मी 2016 पासून स्वयंपाकी म्हणून काम करते, पण गेल्या दीड वर्षांपासून मला मागील दीड वर्षापासून मानधन मिळालेलं नाही. प्रिझम कुमोटी (रा. इरूक ढोडरी, ता. धानोरा) यांनी सांगितलं की, त्यांचे 8 महिन्यांचे मानधन थकित आहे. या महिलांना शासकीय सुविधा, पगारी सुट्टी, साप्ताहिक सुट्टी आणि दरमहा बँक खात्यात थेट मानधन जमा करण्याची मागणी आहे.
आंदोलनाची पार्श्वभूमी
यापूर्वी आर्थिक अधिवेशनादरम्यान मुंबईच्या आझाद मैदानावर शेकडो महिलांनी धरणे आंदोलन केले होते. आदिवासी विकास मंत्री आणि महिला व बालकल्याण मंत्र्यांना निवेदने देण्यात आली. 16 एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयासमोरही आंदोलन झाले. मात्र, शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
प्रशासनाचा दावा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गाडे यांनी सांगितले की, “पाच टक्के अभंग निधीतून सर्व ग्रामपंचायतींना पैसे पाठवण्यात आले आहेत.” परंतु, प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायतींकडून हे पैसे स्वयंपाकी महिलांपर्यंत पोहोचलेले नाहीत, असा महिलांचा आरोप आहे.
मागण्या आणि इशारा
महिलांनी मानधन 20,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. तसेच, थकित मानधन त्वरित देण्याची मागणी आहे. संगठनच्या पदाधिकाऱ्यांनी (कृष्णा चौधरी, गंगा तुलावी, पुष्पा पदा, गौरी कोवाची, अंजू गेडाम, व इतर) चेतावणी दिली आहे की, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
प्रशासकीय दुर्लक्षाचा परिणाम
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2016 पासून कार्यरत आहे. कुपोषण कमी करण्यासाठी गरोदर आणि स्तनदा मातांना पौष्टिक आहार देण्याचे उद्दिष्ट असलेल्या या योजनेत स्वयंपाकी महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांत मानधनात वाढ न झाल्याने आणि थकित मानधनामुळे या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
महिलांनी आदिवासी विकास मंत्री, महिला व बालकल्याण मंत्री आणि जिल्हा प्रशासनाला या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन अटळ आहे, असे संगठनाने स्पष्ट केले आहे.