May 25, 2025

हत्तींचा शहरात प्रवेश: गडचिरोलीत पर्यावरणीय संकटाचा इशारा

गडचिरोली, २५ मे : गडचिरोली शहरात आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दोन जंगली टस्कर हत्तींनी लांजेडा-इंदिरा नगरच्या मुख्य मार्गावर धुडघूस घातला, ज्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नेहमी जंगल आणि आदिवासी वसाहतींमध्ये दिसणारे हे हत्ती थेट शहराच्या हृदयात पोहोचले, ही घटना पर्यावरणीय असंतुलन आणि वन्यजीव-मानव संघर्षाचे गंभीर निदर्शक आहे.

लांजेडा परिसरातील एका दुकानाचे नुकसान करून हे हत्ती चांदाळा, गुरवळा आणि वाकडीच्या जंगलांकडे निघाले. पहाटे ३ वाजता माहिती मिळताच वनविभागाने त्वरित कारवाई करत हत्तींना जंगलात परत पाठवण्यात यश मिळवले. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी सांगितले, “एका ठिकाणी धान्य असल्याने किरकोळ नुकसान झाले, पण वनविभागाच्या अथक प्रयत्नांमुळे हत्ती जंगलाकडे रवाना झाले.”

गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात हत्तींचा वावर वाढला आहे. यापूर्वी ११ मे रोजी आरमोरी तालुक्यातील मानापूर गावात दोन हत्तींनी एका महिलेला जखमी केले होते. कुरखेडा, सूर्याडोंगरी, जेप्रा, देलनवाडी आणि महादवाडी यांसारख्या ग्रामीण भागांमध्येही हत्तींची उपस्थिती नोंदवली गेली होती. मात्र, आता थेट शहरात हत्तींचा प्रवेश ही चिंतेची बाब आहे.

पर्यावरणीय असंतुलनाचा इशारा
जंगलातील बांधकाम, रस्त्यांचे रुंदीकरण, खाणकाम आणि झाडांची कत्तल यामुळे वन्यजीवांचा अधिवास संकटात आहे. हत्तींसारखे प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात शहरांपर्यंत पोहोचत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी वनविभागाकडे गस्त वाढवणे, चेतावणी फलक लावणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मागणी केली आहे.

वनविभागाचे आवाहन
वनविभागाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, पण यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना आवश्यक आहेत.

नागरिकांमध्ये भीती
हत्तींच्या या प्रवेशाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नागरिकांमध्ये दहशत आहे. “जंगल आणि शहर यांच्यातील सीमारेषा पुसट होत आहे. ही केवळ जंगलातील वार्ता नसून, आता ती आमच्या अंगणातली गोष्ट झाली आहे,” असे स्थानिक नागरिक सागर बोरकर यांनी सांगितले.

“गडचिरोलीतील ही घटना वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षितता यांचा समतोल साधण्याची गरज अधोरेखित करते. वनविभाग, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधणे गरजेचे आहे.”

About The Author

You may have missed

error: Content is protected !!