गरीब विद्यार्थ्यावर अन्याय, परीक्षा प्रवेश तिकीट नाकारल्याने शैक्षणिक नुकसान

कुरखेडा, 25 मे (ताहिर शेख ) : तालुक्यातील मालेवाडा येथील अॅड. विठ्ठलराव बनपूरक मेमोरियल महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एम.ए. भाग 2 समाजशास्त्रचा होतकरू विद्यार्थी चक्रपाणी धनंजय पेंदाम याला उन्हाळी 2025 परीक्षेची फी भरूनही परीक्षा प्रवेश तिकीट नाकारण्यात आले. यामुळे तो परीक्षेपासून वंचित राहिला असून, त्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या घटनेने संतापाची लाट उसळली असून, विद्यार्थ्याने थेट गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे.
चक्रपाणीने उन्हाळी 2025 परीक्षेची फी भरली होती. मात्र, महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक हिरामण उईके यांनी शिकवणी वर्ग आणि असायन्मेंटच्या 5,500 रुपये फी न भरल्याने प्रवेश तिकीट देण्यास स्पष्ट नकार दिला. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या चक्रपाणीने काही दिवसांत पैसे भरण्याचे आश्वासन दिले, तरी लिपिकाने त्याला तिकीट दिले नाही. परिणामी, चक्रपाणी परीक्षेला मुकला आणि त्याचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले.
“मी गरीब कुटुंबातील आहे. परीक्षेची फी भरली होती, तरीही मला परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. माझे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याची सखोल चौकशी होऊन मला न्याय मिळावा,” अशी भावनिक मागणी चक्रपाणीने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केली आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना या प्रकरणी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. या घटनेने महाविद्यालयीन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.