पावसाळ्यापूर्वी रस्ते विकासाला गती: गडचिरोलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मॅराथॉन बैठकीत मोठे निर्णय

गडचिरोली, २४ मे : वनविभागाच्या परवानग्याअभावी प्रलंबित रस्ते प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि पावसाळ्यापूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज तब्बल तीन तासांची मॅराथॉन बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांनी जूनपूर्वी पूर्ण होऊ शकणारी रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले. जिथे कामे पूर्ण करणे शक्य नसेल, तिथे तात्पुरत्या उपाययोजनांद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आदेश दिले. विशेषत: आदिवासी वस्ती आणि पाड्यांना जोडणाऱ्या १० रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. या रस्त्यांची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाली असून, ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यांसाठी आवश्यक परवानग्यांमधील विलंब कमी करण्यासाठी संयुक्त पाठपुरावा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. प्रलंबित मंजुरी प्रकरणांवर तातडीने निर्णय घेऊन कामे सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, विभागीय समन्वयावर भर देत सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याचे सांगितले.
यासोबतच, जिल्ह्यातील दूरसंचार सुविधांसाठी प्रलंबित मोबाईल टॉवरच्या कामांवरील अडथळे दूर करून इंटरनेट आणि संपर्क सुविधा अखंड ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांना सोपवण्यात आली.
बैठकीस मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अध्यक्ष अभियंता निता ठाकरे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋशिकांत राऊत, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. ही बैठक गडचिरोलीच्या रस्ते विकास आणि संपर्क सुविधांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.