मानसिक छळ, धमक्या अन् शोषण! चामोर्शीच्या कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्याचे आत्महत्येचे पाऊल
“कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; शिक्षक, व्यवस्थापनावर गंभीर आरोप”
गडचिरोली, ६ जुलै : चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणाऱ्या अनिकेत गजेंद्र सोनटक्के (वय २२, रा. आरमोरी) या विद्यार्थ्याने शिक्षक आणि व्यवस्थापनाकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अनिकेतने समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या पत्र आणि चित्रफितीतून महाविद्यालयातील गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपांचा स्फोटक पर्दाफाश
५ जुलै रोजी अनिकेतच्या पत्र आणि चित्रफितीने समाजमाध्यमांवर धुरळा उडवला. त्यात त्याने शिक्षक तुषार भांडारकर, कर्मचारी पवन बुधबावरे आणि महाविद्यालय व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांचे मानसिक शोषण, धमक्या आणि भविष्याशी खेळण्याचे गंभीर आरोप केले. “विरोध केल्यास अनुत्तीर्ण करू, वर्षानुवर्षे एकाच वर्गात बसवू,” अशा धमक्या दिल्या जातात, असा दावा त्याने केला. गरीब आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते, कमी गुण देऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आणले जाते, आणि दंडाच्या नावाखाली रक्कम वसूल करून शिक्षक-कर्मचारी मौजमस्ती करतात, असा खळबळजनक आरोप अनिकेतने केला आहे.
विद्यार्थ्यांचा संताप, व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
महाविद्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा छळ सुरू असून, तक्रारींकडे व्यवस्थापन डोळेझाक करत असल्याचा दावा अनिकेतने केला. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत संताप व्यक्त केला. दोषी शिक्षक, कर्मचारी आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
संस्थापकांचे स्पष्टिकरण, चौकशीचे आश्वासन
संस्थापक अरुण हरडे यांनी या प्रकरणाची माहिती काल रात्री मिळाल्याचे सांगत चौकशीसाठी समिती नेमल्याचे जाहीर केले. “दोषींवर कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. डॉक्टरांनी अनिकेतच्या मानसिक स्थितीमुळे ६ जुलै रोजीच पोलिसांना बयान घेण्यास सांगितले आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात?
या घट्नेने केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खाजगी महाविद्यालयातील अनागोंदी, विद्यार्थ्यांचे शोषण आणि व्यवस्थापनाचे बेपर्वा वर्तन यामुळे शेतकरी कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने होतो आणि दोषींवर कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
