July 6, 2026

खळबळजनक! बनावट नियुक्तीपत्रांचा गोरखधंदा उघड; तीन महिलांची ५.४० लाखांची फसवणूक

“जिल्हा परिषद व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नावाने बनावट नियुक्ती आदेश; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, भरती रॅकेटचा संशय”

गडचिरोली | प्रतिनिधी, ६ जुलै : गडचिरोली जिल्हा परिषद शाळांमधील परिचर पदभरतीची बनावट जाहिरात समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता त्याहूनही गंभीर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यांच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र तयार करून तीन महिला उमेदवारांची तब्बल ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गडचिरोली शहर पोलिसांनी देवानंद उराडे आणि राकेश मुनगेलवार (रा. गडचिरोली) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित महिलांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कनिष्ठ सहाय्यक आणि शिपाई पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी सप्टेंबर २०२५ पासून वेळोवेळी ३ लाख ५० हजार रुपये रोख आणि १ लाख ९० हजार रुपये ऑनलाइन, अशी एकूण ५ लाख ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्यात आली.

फसवणुकीचा संशय येऊ नये म्हणून आरोपींनी जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नावाने बनावट नियुक्ती आदेश तयार केला. या आदेशात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, बनावट शिक्के, कार्यालयीन नमुना तसेच नियुक्तीच्या अटी-शर्तींचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे उमेदवारांचा विश्वास अधिक दृढ झाला.

मात्र, संबंधित नियुक्ती आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी पोहोचताच तो पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने गडचिरोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद शाळांमधील परिचर पदभरतीची बनावट जाहिरात समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता थेट बनावट नियुक्तीपत्र तयार करून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने शासकीय भरतीच्या नावाखाली कार्यरत असलेल्या संघटित रॅकेटचा संशय अधिक गडद झाला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अथवा फसवणुकीचे बळी समोर येण्याची शक्यता असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

नागरिकांसाठी आवाहन

  • शासकीय नोकरीसाठी कोणालाही पैसे देऊ नका.
  • नियुक्तीपत्र, जाहिरात किंवा निवड प्रक्रिया संबंधित कार्यालयाकडून पडताळून घ्या.
  • संशयास्पद व्यक्ती किंवा बनावट कागदपत्रांची माहिती तात्काळ पोलिस किंवा संबंधित विभागाला द्या.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!