July 6, 2026

इंजेक्शननंतर ५ वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; संतप्त पालकांची चौकशी व कारवाईची मागणी

गडचिरोली, ६ जुलै : सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात तपासणी व पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. इंजेक्शन दिल्यानंतर काही क्षणांतच मुलाची प्रकृती खालावून त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथील सविन मोहन चेन्नुरी (वय ५) याला आरोग्य विभागामार्फत गडचिरोली येथे आयोजित हृदय शस्त्रक्रिया शिबिरासाठी ४ जुलै रोजी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ५ जुलै रोजी त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूची माहिती मिळताच गडचिरोली येथील शवविच्छेदनगृहासमोर सविनच्या आई-वडिलांनी आक्रोश व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सविनचे वडील मोहन चेन्नुरी यांनी केली.

पालकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर सविनची प्रकृती स्थिर होती आणि तो इतर मुलांसोबत खेळत होता. वैद्यकीय अधीक्षकांच्या निर्देशानुसार त्याला निरीक्षणासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री सुमारे ९ वाजता परिचारिकेने इंजेक्शन दिल्यानंतर काही क्षणांतच सविनने प्रतिसाद देणे बंद केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश वडालकोड यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, सविनच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पालकांनी सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मर्ग नोंदवून तपास सुरू केला असून, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधिकारी एम. के. नंदे यांनी दिली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!