नक्षलवादाला आळा घालण्यासाठी कायदा: महाराष्ट्राचे जनसुरक्षा विधेयक मंजूर
“महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर: नक्षलवादावर कडक कारवाईचे पाऊल”
मुंबई, ११ जुलै : महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक काल (दि. १०) विधानसभेत बहुमताने मंजूर झाले. नक्षलवाद, माओवादी चळवळ आणि अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटनांवर प्रभावी कारवाईसाठी हा कायदा महत्त्वाचा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हा अजामीनपात्र आणि प्रतिबंधात्मक कायदा नागरिकांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यावर केंद्रित आहे. “हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावणार नाही किंवा समाज माध्यमे, प्रसारमाध्यमांवर वचक निर्माण करणार नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. विधेयकावरील चर्चेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे त्यांनी समर्पक निरसन केले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील दोन्ही सभागृहांच्या समितीच्या सूचनांनुसार हे विधेयक तयार करण्यात आले. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड येथे असे कायदे आधीपासून लागू असून, महाराष्ट्रातही स्वतंत्र कायद्याची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती.
“हा कायदा डाव्या विचारसरणीच्या पक्षांविरुद्ध किंवा आंदोलने, सैद्धांतिक चळवळींविरुद्ध नाही. केवळ नुकसान पोहोचवणाऱ्या संघटनांवर कारवाई हा उद्देश आहे,” असे फडणवीस यांनी नमूद केले. माओवादी चळवळ कमकुवत होत असून, महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील त्यांचा प्रभाव लवकरच संपुष्टात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आता हे विधेयक विधान परिषदेत मांडले जाईल. तेथे मंजुरी आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर ते कायद्यात रूपांतरित होईल.
