डॉक्टर फोनवर, रुग्ण वेदनेत! कुरखेड्यातील उपजिल्हा रुग्णालयात गंभीर आरोप
कुरखेडा, ६ मार्च : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील ५० खाटांच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती सातत्याने गंभीर बनत चालली आहे. सामान्य गोर-गरीब नागरिकांसाठी आधारस्तंभ मानले जाणारे हे रुग्णालय आता निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणाचे केंद्र बनले आहे. आपत्कालीन स्थितीतही डॉक्टर आणि नर्स रुग्णांकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर बोलण्यात व्यस्त राहतात, असे आरोप समोर आले आहेत.
घटना काय घडली?
पूर्णानंद नेवारे, ह्यूमन राइट्स ऍक्टिव्हिस्ट आणि मुख्य वैद्यकीय शाखा प्रमुख (गडचिरोली), यांच्या आईला अचानक पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. सकाळी सुमारे ७:४५ वाजता तिला आंतररुग्ण विभागात (आयपीडी/इमर्जन्सी) आणण्यात आले. रुग्णाला बसवून डॉक्टरांना तब्येतीची माहिती दिल्यानंतरही कर्तव्यावर असलेले डॉक्टर मोबाईलवर बोलण्यात इतके व्यस्त होते की, रुग्णाकडे वळून पाहण्याचीही वेळ काढली नाही. त्याऐवजी डॉक्टर आणि नर्स यांनी रुग्णाला ओपीडीमध्ये नेण्याचा सल्ला दिला. ओपीडी मात्र ८:३० वाजता सुरू होतो आणि डॉक्टर ९ वाजता येतात. या कालावधीत रुग्णाला तीव्र वेदना सहन कराव्या लागल्या. रुग्णाची प्रकृती बिघडली असती तर जबाबदार कोण? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
नातेवाइकांना खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागली
अशा परिस्थितीत नातेवाइकांना शेवटी खासगी दवाखान्यात उपचारासाठी पळ काढावा लागला. उपजिल्हा रुग्णालयातील अशा वारंवार होणाऱ्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. रुग्णालयात मूलभूत सुविधा, पुरेसे मनुष्यबळ आणि जबाबदार वर्तनाचा अभाव असल्याचे दिसून येते.
प्रशासनाचे दुर्लक्ष का?
कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाची ही परिस्थिती नवीन नाही. यापूर्वीही रिक्त पदे, अपुरी साधने आणि सेवा कोलमडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तरीही प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, दुर्गम भागात असलेल्या या रुग्णालयावर हजारो ग्रामीण नागरिक अवलंबून आहेत. पण आपत्कालीन वेळीही डॉक्टर मोबाईलवर गुंतलेले असतील, तर रुग्णांचे जीवन धोक्यात येणे स्वाभाविक आहे.
नागरिकांचा प्रश्न:
– आपत्कालीन विभागात डॉक्टर कर्तव्य बजावताना मोबाईल वापरणे योग्य आहे का?
– रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा वर्तनाला जबाबदार धरले जाईल का?
– प्रशासन कधीपर्यंत दुर्लक्ष करणार?
या घटनेने एकदा पुन्हा आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघडकीस आली आहे. स्थानिक प्रशासन, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि रुग्णालयातील सुधारणा घडवाव्यात, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अन्यथा, अशा दुर्लक्षामुळे आणखी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही!
