इथली लोकशाही दारूने भ्रष्ट झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग
1 min readगडचिरोली (जी एन एन प्रतिनिधी )“कान उघडे ठेऊन ऐका, महाराष्ट्रातील लोक दरवर्षी दोन लाख कोटी रुपयांची दारू पितात”, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केलं.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रात निवडणुका दारूवर जिंकल्या जात असल्याचा आरोप करत प्रश्न दारू आहे की दारुबंदी असा प्रश्नही विचारला. ते शनिवारी (४ फेब्रुवारी) वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत बोलत होते.
डॉ. अभय बंग म्हणाले, “वर्धा आणि गडचिरोली हे महाराष्ट्रातील दोनच जिल्हे आहेत जिथं दारुबंदी आहे. गडचिरोलीच्या कमी, मात्र, वर्ध्याच्या दारुबंदीवर अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो की, दारुबंदी हाच प्रश्न आहे. महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे की, दारू हा प्रश्न आहे की दारूबंदी हा प्रश्न आहे? तुम्हाला काय सोडवायचं आहे?”
“महाराष्ट्रातील लोक दरवर्षी दोन लाख कोटी रुपयांची दारू पितात”
“ज्यांना समाजाचं लक्ष दारू या प्रश्नाकडे जाऊ नये असं वाटतं ते दारुबंदीचा बागुलबुवा उभा करतात आणि प्रश्नापासून समाजाचं लक्ष हटवतात. आज हा महाराष्ट्र आहे की मद्यराष्ट्र असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कान उघडे ठेऊन ऐका, महाराष्ट्रातील लोक दरवर्षी दोन लाख कोटी रुपयांची दारू पितात. हे सरकारी आकडेवारी आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या आकडेवारीवरून सांगतो आहे,” असं मत अभय बंग यांनी व्यक्त केलं.
“महाराष्ट्रात निवडणुका दारूवर जिंकल्या जातात”
“महाराष्ट्राचं राजकारण दारूच्या पैशांवर चालतं. महाराष्ट्रात निवडणुका दारूच्या पैशांवर आणि दारूवर जिंकल्या जातात. इथली लोकशाही दारूने भ्रष्ट झाली आहे. स्त्रियांवर जितक्या बलात्कार व विनयभंगाच्या घटना घडतात त्या बातम्यांमध्ये शेवटी अत्याचारी दारूच्या नशेत असल्याचं वाचायला मिळतं. असं असताना एअर इंडियाच्या एका प्रवाशावर कुणीतरी लघुशंका केली याची चर्चा होते. ते घाणेरडंच होतं, मात्र तो दारूच्या नशेत होता. तुम्ही दारूला कधी शिक्षा करणार?” असा प्रश्न डॉ. बंग यांनी विचारला.
“प्रश्न दारू आहे की दारुबंदी आहे?”
अभय बंग पुढे म्हणाले, “प्रश्न दारू आहे की दारुबंदी आहे? हे ठरवलं पाहिजे. दारू समाजाला हवी की नको? व्यक्तीची इच्छा विरुद्ध समाजहित हा एक निकष मी लावेन. व्यक्तीची इच्छा होतेय, पण समाजाचं अहित होत असेल, तर कशाला प्राधान्य द्यायचं? व्यक्तीला ३०० किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी चालवावी वाटत असेल, पण अपघात होऊन दुसरे लोक मरणार असतील तर तुम्ही त्यावर नियंत्रण करतात. व्यक्तीच्या उनाड इच्छा आणि समाजाचं व्यापक हित यात कायमच समाजहिताला प्राधान्य द्यावं लागेल.”
“इतरांना त्रास होता कामा नये ही व्यक्तीच्या स्वातंत्र्याची मर्यादा”
“लोक म्हणतात दारू पिण्याचं स्वातंत्र्य आहे. याच्या दोन बाजू आहेत. पहिली गोष्ट एखाद्याच्या दारू पिण्याने इतरांना त्रास होत असेल, तर त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याची मर्यादा ही आहे की इतरांना त्रास होता कामा नये. दारू पिणाऱ्याच्या बायकोला तुम्ही विचारा. संध्याकाळी नवरा दारू पिऊन येतो तेव्हा तिच्यावर काय बेतते हे विचारा. तिला अक्षरशः दारू पिऊन सैतान घरी आला असं वाटतं,” अशी माहिती डॉ. बंग यांनी दिली.
“व्यसनी हा नवरा कधी मरेन अशी महिला वाट पाहतात”
“मी अशा हजारो व्यसनींच्या बायकांसोबत बोललो आहे. या महिला सांगतात की, हा नवरा कधी मरेन अशी आम्ही वाट पाहतो. भारतीय स्त्रिया वैधव्याची इच्छा व्यक्त करते इतकं दारू भयानक व्यसन आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.