ऐन बोहल्यावर थांबला बालविवाह!
“शासकीय पथकाच्या धाडसी हस्तक्षेपाने वाचले एका अल्पवयीन मुलीचे भविष्य”
चामोर्शीत प्रशासनाची वेळेवर कारवाई; पालकांचे समुपदेशन, समाजासाठी जागरूकतेचा संदेश
गडचिरोली, ३ जुलै : वधूच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती. अंगणात मांडव सजला होता, अक्षतांची तयारी पूर्ण झाली होती आणि बोहल्यावर चढण्याची वेळ जवळ आली होती. दुसरीकडे नवरदेवाच्या घरीही हळदीचा कार्यक्रम आटोपून १ जुलै रोजी वरात निघण्याची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, नियतीने वेगळाच निर्णय घेतला होता. ३० जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता अचानक शासकीय वाहन वधूच्या दारात पोहोचले आणि काही क्षणांतच आनंदाच्या वातावरणावर शांततेची छाया पसरली. कारण, ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी प्रशासनाने एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह रोखून तिचे भविष्य सुरक्षित केले.
चामोर्शी तालुक्यातील एका गावात १८ वर्षांखालील मुलीचा बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळताच प्रशासनाने तातडीने कारवाई केली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले तसेच कवेश्वर लेनगुरे आणि निलेश देशमुख यांच्या पथकाने तत्काळ गावात धाव घेत बालविवाह थांबवला.
पथकाने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचे सविस्तर समुपदेशन केले. बालविवाह हा केवळ सामाजिक अनिष्ट प्रघात नसून कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याची जाणीव पालकांना करून दिली. समुपदेशनानंतर पालकांनी विवाह स्थगित करण्यास सहमती दर्शविल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रशासनाच्या या वेळेवर झालेल्या हस्तक्षेपामुळे एका मुलीचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्य जपले गेले. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या या कारवाईचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचा स्पष्ट संदेश या घटनेतून गेला आहे.
समाजासाठी संदेश
बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहते, मातामृत्यू आणि बालमृत्यूचा धोका वाढतो, तसेच त्यांच्या आरोग्य व सर्वांगीण विकासावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करू नये, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.
प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात बालविवाहाची माहिती मिळाल्यास ती तात्काळ संबंधित प्रशासन, महिला व बालविकास विभाग किंवा चाईल्ड हेल्पलाईन १०९८** वर कळवावी. एका जागरूक नागरिकाच्या वेळीच दिलेल्या माहितीमुळे एका निष्पाप मुलीचे आयुष्य बदलू शकते.
