July 3, 2026
“३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण; चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू होणार”

गडचिरोली , ३ जुलै | प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गडचिरोली येथे नवीन केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya) सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मुख्यालयाने अधिकृत मंजुरी दिली असून, चालू शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून विद्यालय सुरू करण्यात येणार आहे. पुढील ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनने यासंदर्भातील अधिकृत आदेश २ जुलै २०२६ रोजी जारी केला आहे. मार्च २०१९ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या देशातील ५० नवीन केंद्रीय विद्यालयांपैकी गडचिरोलीचे विद्यालय आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे.

तात्पुरत्या इमारतीत सुरू होणार शाळा

प्रायोजक प्राधिकरणाने विद्यालयासाठी आवश्यक जागा केंद्रीय विद्यालय संघटनच्या नावे हस्तांतरित केली असून, तात्पुरत्या स्वरूपात शाळा सुरू करण्यासाठी इमारतीची व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, सेमाना बायपास रोडयेथे प्रारंभी केंद्रीय विद्यालयाचे वर्ग भरविण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक वर्गखोल्या व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळा सुरू होण्याच्या प्रारंभीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करत आहे.

प्रारंभी पहिली ते पाचवीचे वर्ग

सुरुवातीला नागरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक इयत्तेचा एक विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर गरजेनुसार टप्प्याटप्प्याने पुढील वर्ग सुरू करण्यात येतील. प्रवेश प्रक्रिया आणि इतर आवश्यक प्रशासकीय औपचारिकता पुढील ३० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत.

कायमस्वरूपी इमारतीचे कामही सुरू होणार

तात्पुरत्या इमारतीत शैक्षणिक कार्य सुरू असतानाच केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीच्या बांधकामालाही समांतरपणे सुरुवातकरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली. भविष्यात विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सुविधा असलेले सुसज्ज विद्यालय उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा

गडचिरोली येथे केंद्रीय विद्यालय सुरू होणे हा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासातील ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध होणार असून, जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!