“परीक्षा केंद्रात झालेल्या गैरप्रकार प्रकरणात कुरखेडा पोलिसात गुन्हा दाखल; संस्था प्रमुखांचे येथील प्राचार्यांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश”
1 min readगडचिरोली; (प्रतिनिधी); ९ मार्च: राज्यभर गाजत असलेल्या कुरखेडा येथील कॉपी प्रकरणात काल ८ मार्च २०२३ ला येथील भरारी पथक प्रमुख कुरखेडा तहसीलदार सोमनाथ माळी यांनी प्रकरणाची गांभीर्य लक्ष्यात घेता वरिष्ठांच्या आदेशावरून कुरखेडा पोलिस स्टेशन येथे रीतसर तक्रार देत परीक्षा केंद्र प्रमुख प्रा. किशोर अंबरदास कोल्हे यांचे विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध विद्यापीठात, बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परीक्षा कायदा, १९८२ अंतर्गत कुरखेड़ा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती आज जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्रेस विज्ञाप्ती काढून दिलेली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) फेब्रुवारी, मार्च 2023 परीक्षा केंद्र 627 केंद्र संचालकाबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओ व त्या अनुषंगाणे शिक्षण विभाग (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे कडुन गंभीर दखल घेण्यात आली आहे. सदर बाबीचे गांभीर्य विचारात घेवून गटशिक्षणाधिकारी तथा तालुका परीरक्षक सी. ए. पुराणिक यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सदर चौकशीच्या अहवाल व सचिव, विभागीय मंडळ नागपुर यांनी केलेल्या सूचनेनुसार तात्काळ किशोर अंबरदास कोल्हे यांचे केंद्रसंचालक पदावरून पदमुक्त केले असून त्यांचे ऐवजी कालीदास पुंडलीक सोरते (उच्च माध्यमिक शिक्षक) यांची नियुक्ती केंद्र संचालक म्हणून करण्यात आली आहे. तसेच सदर गैरप्रकाराची तक्रार प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाणे कुरखेडा या ठिकाणी तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच सदरच्या गंभीर प्रकाराबाबत चौकशी करणेबाबत विभागीय सचिव यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना आदेश दिले आहेत. इयत्ता 10 वी 12 वी च्या परीक्षा संबंधाने कोणताही गैरप्रकार झाल्यास दोषी विरुध्द नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल असे शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा सदस्य सचिव जिल्हा दक्षता समिती गडचिरोली आर. पी. निकम यांनी कळविले आहे.
“संस्था प्रमुखांनी येथील प्राचार्यांना ३ दिवसात अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश”
कुरखेडा येथे झालेल्या व्हायरल व्हिडिओ मुळे शाळेची व संस्थेचीही मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या प्राध्यापकांवर शिस्ती करण्यासाठी आता संस्था प्रमुख ही गंभीर असून प्रकरणाची माहिती मिळताच येथील प्राचार्यांना लेखी आदेश पाठवून तात्काळ ३ दिवसाचे आत अहवाल सदर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
“जाणून घ्या काय आहे महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध विद्यापीठात, बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परीक्षा कायदा, १९८२”
२५ मे १९८२ रोजी अस्तित्वात आलेल्या सदर कायद्यात महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर निर्विष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंधित करण्याबाबत अध्यादेश १९८२ प्रख्यापित केलेला आहे.
सदर कायद्याच्या पोट कलम (१) नुसार अपराध सिद्ध झाल्यास ६ महिने ते १ वर्षापर्यंत कारावास किंवा ५०० रुपये ते १ हजार रुपये पर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा होतील असे प्रावधान आहेत.
सदर अधिनियमाखालील सर्व अपराधांची कोणत्याही महानगर दंडाधिकारी कडून किंवा कोणत्याही प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कडून संक्षिप्तरित्या न्याय चौकशी करण्यात येईल आणि उक्त संहितेचे कलमे २६२ व २६५ धरून त्यांच्या तरतुदी शक्य होईल तेथवर , अशा न्यायचैकाशी लागू होतील, अशी प्रवधान या कायद्यात आहेत.