“आरोग्य विषयक (HMIS) निर्देशांकामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात अव्वल”
1 min readगडचिरोली;(प्रतिनिधी); १९ सप्टेंबर: केंद्र शासनाच्या आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती पोर्टल (HMIS) गुणांक प्रक्रियेत गडचिरोली जिल्हा राज्यात प्रथम आल्याची माहिती येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र गडचिरोली जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा म्हणून जरी असली तरी डिजिटल प्रणाली द्वारे शासनापर्यंत माहिती उपलब्ध करून देण्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अग्रस्थानी आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा गरजेच्या अनुपात अनुसार स्पेशालिस्टची कमतरता असताना ही, उपलब्ध संसाधन व वैद्यकीय मनुष्यबळाचे आधारे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्यातील काही अपवाद वगळता शासनाने ठरवून दिलेल्या माणकानुसार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक आहे.
जिल्हाधिकारी संजय मीना व मुख्याधिकारी श्रीमती आयुषी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अतिदुर्ग डोंगराळ भागांमधील नागरिकांना आरोग्य सेवेचा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देता यावा याकरिता सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.
आरोग्य विभाग मार्फत आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती या केंद्र शासनाच्या पोर्टल वरती शहरी व ग्रामीण भागात होत असलेल्या सेवा बाबत माहिती दर महिन्याला अद्यावत केले जात असते. पोर्टलमध्ये 62 प्रकारच्या विविध प्रकारचे आरोग्यविषयक सेवांचा समावेश केला आहे. जसे गरोदर माताची नोंदणी , बालकांचे लसीकरण, किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण, गरोदर मातांची विविध प्रकारच्या रक्ताची चाचणी, मातेला गरोदरपणात देण्यात येणारी औषध उपचार, गर्भनिरोधक साधनांचा वापर, संस्थेतील प्रसूती बाबत माहिती अद्यावत केली जाते.
राज्यस्तरावर पोर्टल वरती या निर्देशकांचे मूल्यमापन करून राज्यातील जिल्हा निहाय गुणांक ठरवला जातो त्यानुसार महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक गुण प्राप्त झालेले आहे. सोयी सुविधांचा अभाव असल्याची ओरड असणारे जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांना मागे टाकत प्रथम क्रमांक उद्दिष्ट गाठल्याने सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वप्निल बेले डॉ. विनोद मशाखेत्री , जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या सततच्या पाठपुरावामुळे सदर माहिती अद्यावत ठेवणे आरोग्य विभागाला शक्य झाल्याची माहिती डॉ. साळवे यांनी दिली. जिल्हास्तर व तालुकास्तरावरील विविध प्रशिक्षणाचे बैठकीचे आयोजन तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीयअधिकारी, आरोग्य कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी आशा, गटप्रवर्तक यांच्या माध्यमातूनच हे सर्व उद्दिष्ट गाठता आले आहे अशी माहिती डॉ. दावल साळवे यांनी दिली आहे.
संसाधनांचा अभाव व इंटरनेटची अन उपलब्धता हे कारण समोर करून नेहमीच शासकीय स्तरावर पुरवली जाणारी माहिती ही अर्धवट व मुदतपूर्वी उपलब्ध न झाल्याने कित्येकदा शासकीय स्तरावर जिल्ह्याला मागास असल्याचा चित्र निर्माण होत होता. परंतु उपलब्ध त्या संसाधनां चा चांगल्या पद्धतीने उपयोग करून उद्दिष्ट गाठता येतात हे आरोग्य विभागाने सिद्ध केलेले आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य संबंधीचा लेखाजोखा ऑनलाईन पद्धतीने शासन दरबारी नियोजित वेळी सादर केल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विषय परिस्थितीची जाण वेळेवर झाल्याने त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात शासन स्तरावर खूप मदत होते. आरोग्य विभागाप्रमाणेच इतर सर्व विभागांनी या डिजिटल युगात कुठल्याही जिल्ह्याला मागासलेपणाचा ग्रहण शिल्लक न ठेवता संपूर्ण संसाधनांचा व्यवस्थित उपयोग करून कार्य केल्यास जिल्हा इतरही विभागात अग्रेसर होऊ शकतं अशी आशा व्यक्त केली जात आहे.
भौतिक संरचनेच्या किचकट परिस्थितीमुळे आज सर्वाधिक चर्चेत असणारा आरोग्य विभाग जिल्ह्यामध्ये वर्चुअल डेटा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर ठरलेला आहे. भौतिक संसाधनांची व वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरजेनुसार उपलब्धता झाल्यास जिल्ह्यामध्ये असलेली आरोग्य संबंधीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागू शकते.