December 23, 2024

“कोरची येथे अघोषित आणीबाणी? पत्रकारांच्या लेखणीवर दबावात्मक बंदी”; “वाईस ऑफ मीडियाची पत्रकारांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही”

1 min read

गडचिरोली ; (नसीर हाशमी) १९ सप्टेंबर : छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गडचिरोलीच्या शेवटच्या तालुक्यात अघोषित आणीबाणी लागू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भागात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा एवढा वरदस्त आहे की, येथील पत्रकारांच्या घराला वेढा घालून त्यांना धमकवण्याचे प्रकार झाले आहेत. शेवटी परिवारची सुरक्षा व स्वतःच्या जीवाच्या भीतीने येथील पत्रकारांनी आम्हाला अवैध व्यवसायाबद्दल काहीही बोलायचं नाही, आम्ही बातम्या लिहिणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा असे लेखी आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने संघटीत असलेल्या अवैध व्यवसायिकांच्या धाकाने या भागात होणाऱ्या कुठल्याही अवैध व्यवसाय अन्यायपूर्ण कामाची बातमी कोरची येथील कुठलाही पत्रकार लिहीत नाही.

नुकत्याच व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य व जिल्हा स्तरीय पदाधिकाऱ्यांनी कोरची येथील पत्रकारांची आढाव सभा शासकीय विश्रामगृह कोरची येथे आयोजित केली होती. या आढावा सभेमध्ये गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार , राज्य कार्यवाहक संजय तिपाले, विदर्भ कार्याध्यक्ष सुमित पाकलवार, जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयंत निमगडे व कोरची तालुका अध्यक्ष राहुल अंबादे, तालुक्यातील सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

या आढावा सभेमध्ये कोरची तालुक्यात पत्रकारांवर आजपर्यंत झालेले विविध अन्याय, खोट्या पोलिस कारवाई व अवैध व्यावसायिकांच्या दबावात्मक धोरणाची माहिती संघटनेपुढे मांडली. कोरची हा तालुका नक्षली कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे. छत्तीसगड सीमेलगत घनदाट जंगल परिसराने वेढलेल्या या तालुक्यामध्ये नक्षल्यांनी अनेक हिंसक कारवाया घडवून आणल्या आहेत. त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. याचाच फायदा घेत अवैध व्यवसाय करणारे माफिया मागील काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.

संघटने पुढे आपली व्यथा मांडतांनी कोरची येथील पत्रकारांनी सांगितले की, कोरची परिसरात मोठ्या प्रमाणात कोंबडा बाजार भरवला जातो, याच्या आड या परिसरात जुगार दारू सारख्या अवैध धंद्यांना चालविण्यात येते. लगतच्या छत्तीसगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी करून त्यांना येथील जंगल परिसरामध्ये जमा केला जातो व मोठ्या प्रमाणात वाहनांमध्ये कोंबून त्यांना तेलंगाना व इतर राज्यांमध्ये कत्तलीसाठी पाठविण्यात येतात.

येथील काही पत्रकारांनी या अवैध व्यवसाय विरोधात वर्तमानपत्रात बातमी छापली होती. अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पत्रकारांना टार्गेट करत त्यांच्या घरावर गुंडांना पाठवून शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली. या कृत्याने भयभीत होऊन येथील पत्रकारांनी पोलिसांसमक्ष या अवैध व्यवसायाबद्दल आम्हाला काहीच बोलायचे नाही आणि याबद्दल तर आम्ही काहीच बातमी लिहिणार नाही अशी लेखी संमती दिल्यानंतर त्यांची सुटका झाली होती.

कोरची येथील दडपशाही ही लोकशाहीच्या चौथा स्तंभाला एका प्रकारे आवाहन देत आहे. परिसरातील सत्य परिस्थिती जागासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना अशा पद्धतीने आपला जीव मुठीत घेऊन दुर्गम भागात पत्रकारिता करावी लागते. हे भयवाह वास्तव व्हॉईस ऑफ मीडियाच्या आढावा बैठकीने समोर आले आहे. संपूर्ण देशामध्ये पत्रकार व पत्रकारितेच्या संरक्षणाकरिता झटणाऱ्या संघटनेने पहिल्यांदाच कोरची येथील पत्रकारांची आढावा बैठक आयोजित केली होती. अनेकवेळा त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी संघटनेपर्यंत पोहोचत नाही. जरी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या पत्रकारांच्या संघटना अस्तित्वात असल्या तरी ते प्रत्यक्षात या पत्रकारांपर्यंत पोहोचून त्यांची अडचणी व बाजू जाणून घेत नाही. याचा परिणाम असा होतो की शेवटी स्वतःची सुरक्षा व परिवाराच्या चिंतेने त्यांना या सगळ्या लेखणीतून स्वतःला दूर करून घ्यावे लागते.

ज्या तळमळीने आपुलकीने या आढावा बैठकीमध्ये कोरचीच्या या पत्रकारांनी व्यथा मांडल्या यावरून असे चित्र समोर उभे होते की ज्या भागांमध्ये एकेकाळी नक्षल्यांची दहशत होती त्या भागात आता अवैध व्यवसायांनी आपली जागा निर्माण केलेली आहे. याचाच परिणाम आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरची हे ठिकाण गौतस्करीसाठी व अवैध व्यवसायांसाठी सुरक्षित मानले जाते. जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकाऱ्यांना तालुक्याची परिस्थिती अवगत करून देत या संदर्भात दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी येथील पत्रकारांनी संघटनेपुढे मांडली आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोशींवर नक्कीच कारवाई होईल याची संघटनेच्या वतीने ग्वाही देण्यात आली.

 

“कोरची येथील दोन पत्रकारांचे मोबाईल दोन वर्षापासून पोलिसांच्या ताब्यात;

कोरची येथे आढावा बैठकीदरम्यान संघटने पुढे अजून एक धक्कादायक माहिती समोर आली की, मागील दोन वर्षापासून दोन पत्रकारांची मोबाईल पोलिसांनी जप्त करत त्यांच्यावर गोपनीय दस्तऐवजाची कारवाई केली आहे. येथील दोन पत्रकार नंदकिशोर वैरागडे व राष्ट्रपाल नखाते यांनी आरोग्य विभागाशी संबंधित एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्यातील आकडेवारी संदर्भात येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आक्षेप होता. त्यांनी पत्रकारांच्या विरोधात खोटी बातमी वर्तमानपत्र प्रसिद्ध केली म्हणून पोलीस स्टेशन कोरची येथे लेखी तक्रार दिली होती. पोलीस स्टेशन येथून चौकशी करता फोन आल्यानंतर आपल्या विरोधात काय तक्रार दाखल झाली आहे हे पाहण्यासाठी गेलेले या दोन पत्रकारांनी त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या लेखी कागदाला वाचून त्याची फोटो आपल्या मोबाईल मध्ये घेतल्याचे कारण समोर ठेवून तत्कालीन ठाणेदार यांनी गोपनीय दस्तऐवजाचा अभंग केला, शासकीय गोपनीयतेचा भंग केला असा आरोप लावत त्यांच्या विरोधात फौजदारी दाखल केली व त्यांनी दोघांचेही मोबाईल जप्त करून घेतले. चौकशीच्या नावाखाली या दोन पत्रकारांना वारंवार पोलीस स्टेशन येथे बोलावून पडताळीत व अपमानित करण्याचा कामही झाला. जाचाला कंटाळून या पत्रकारांनी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली परिणामी सदर प्रकरण कोरची पोलीस स्टेशन येथून कुरखेडा पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. झालेल्या सदर कारवाई मध्ये या दोन पत्रकारांचे मोबाईल मागील दोन वर्षापासून पोलिसांच्या ताब्यातच आहेत. तिथे झालेल्या चुकीच्या कामांची प्रसिद्ध केल्याने या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात पडताडीत व्हावं लागलं. अखेर पत्रकारांच्या पाठीशी कुठलीही संघटना तटस्थपणे उभी नसल्याने यांना या मनमानी करणाऱ्या लोकांच्या अन्यायाला सहन करावे लागते. पत्रकारावर झालेली कारवाई ही चुकीची व आकसपोटी केलेली होती. सदर कारवाई संदर्भात संघटनेच्या वतीने वरिष्ठांकडे मांडणी करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आली. पत्रकार असंघटित असले तर कशाप्रकारे अन्याय होतो याचा बोलका उदाहरण कोरचीच्या या आढावा बैठकीत समोर आले. जिल्ह्यातील पत्रकारांनी संघटनेसोबत एकजुटीने उभे राहून अशा कुठल्याही प्रकारच्या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करावा असेही आव्हान यावेळी करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!