“गडचिरोली येथे झेंडेपार लोहखाणीची पर्यावरण विषयी जनसुनावणी पूर्ण”; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कडून परवानगी मिळताच सुरू होणार उत्खनन”
1 min readगडचिरोली,(प्रतिनिधी); १० ॲक्टोबर : जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाची झोप उडवणाऱ्या झेंडेपार येथील ५ लोहखांनची पर्यावरण विषयक जनसूनवाई अखेर आज नियोजन भवनात यशस्वी रित्या पार पडली. जनसुनावणी दरम्यान प्रकल्प प्रभावित होणाऱ्या गावकऱ्यांना सहभागी होऊ न देण्याचा आरोपही झाला.
‘पेसा’ कायद्यान्वये ग्रामसभांची परवानगी न घेता जनसुनावणी घेण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर खाण समर्थक आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने झेंडेपार येथील प्रस्तावित लोहखाणींच्या जनसुनावणीदरम्यान प्रचंड गदारोळ झाल्याचे दिसून आले.
कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे पाच लोहखाणी प्रस्तावित असून, त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात जनसुनावणी घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खाण कंपन्यांनी शासनान सादर केलेल्या प्रस्तावांचे वाचन करुन माहिती दिली. त्यानंतर उपस्थित नागरिकांचे आक्षेप नोंदविण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी या खाणीला तीव्र विरोध दर्शविला. झेडेंपारच्या जंगलात आदिवासींचे पारंपरिक दैवत असून, तेथे दरवर्षी ‘राव पाट गंगाराम’ यात्रा भरते. आदिवासी या दैवताची पूजा-अर्चा करतात. त्याचा विचार करण्यात आला नाही. झेंडेपारच्या जंगलात कोणकोणत्या प्रजातींच्या वनस्पती आहेत त्यांचे सर्वेक्षण केले काय, जंगलात वन्यजीव नाहीत असे खाण कंपन्या कोणत्या आधारावर म्हणतात, या कंपन्या शासनाला प्रतिटन किती रॉयल्टी देणार, असे अनेक प्रश्न विचारून सीएसआर फंड ग्रामसभांना देण्याची मागणी केली. आदिवासींचे जीवन आणि पर्यावरण उद्ध्वस्त करुन विकास नको आहे, असे डॉ.उसेंडी म्हणाले.
काँग्रेस नेते डॉ.नामदेव किरसान यांनी पेसा कायद्यान्वये कोणतीही खाण सुरु करताना ग्रामसभांच्या परवानगीची गरज असल्याचे सांगून, आदिवासींच्या हिताचा विचार करुन विकास व्हावा, असे मत व्यक्त केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर म्हणाले की, आदिवासींनी जल, जंगल आणि जमिनीचे संवर्धन केले आहे. त्यांचा वापर खाण कंपन्या स्वत:च्या फायद्यासाठी करत असतील तर आदिवासींना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. कंपन्या जर शंभर टीएमसी पाणी घेत असतील तर भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होईल आणि शेतीला पाणी मिळणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
एका महिलेने खाण पट्ट्यात एकही झाड नसल्याच्या खाण कंपन्यांच्या म्हणण्यावर तीव्र आक्षेप घेत तेथे हजारो झाडे असल्याचे सांगितले. विजय पोरेटी, सिद्धार्थ राऊत, सुरेश काटेंगे, युनुस शेख, नकुल सहारे, नरेश सहारे, चंद्रकांत कल्लो, रुपेश नरोटे आदींनी विविध प्रश्न उपस्थित करुन लोहखाणीला विरोध दर्शविला.
खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, कोरचीतील भाजप नेते आनंद चौबे, दीपक नायक यांनी लोहखाणीचे जोरदार समर्थन केले. लोहखाणी सुरु झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल आणि त्या अविकसित भागाचा विकास होण्यास मदत होईल, असे खा.नेते म्हणाले. आ.कृष्णा गजबे यांनी त्या भागात पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करावी तसेच ज्यांची शेती संपादित करण्यात आली असेल, त्यांना योग्य मोबदला द्यावा आणि स्थानिकांना रोजगार द्यावा इत्यादी मागण्या केल्या. गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी केवळ लोह खनिजाचे उत्खनन करुन चालणार नाही तर पाचही कंपन्यांनी स्थानिक ठिकाणी कारखाने उभारले पाहिजे, असे सांगितले. शिवाय आदिवासींच्या पुरातन देवस्थानांचे जतन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पत्रकार हेमंत डोर्लीकर यांनी पेसा कायद्यान्वये जनसुनावणी घेण्यासाठी ग्रामसभांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याने ही जनसुनावणी अवैध असून, ती रद्द करावी, अशी मागणी केली. डोर्लीकर यांचा मुद्दा खाण विरोधकांनी उचलून धरला, तर समर्थकांनी विरोध करीत जनसुनावणी वैध असल्याचे सांगितले. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.त्यानंतर जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर वातावरण शांत झाले. मीणा यांनी उपस्थित नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनीही आपली भूमिका मांडून पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली न करता लोहखाण सुरु करणार असल्याचे सांगितले. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेचे दस्तऐवज शासनाच्या पर्यावरण विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
“सुनावणीलागडचिरोली गाठू न शकलेल्या झेंडेपार येथील नागरिकांनी गावातच सुरु केले आंदोलन”
आजच्या जनसुनावणीला झेंडेपार येथील अनेक नागरिक येऊ शकले नाही. कोरची परिसरातील सर्व चार चाकी वाहन कंत्राटदारांनी किरायावर घेतल्यामुळे झेंडेपार येथील लोकांना वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. काही लोकांनी दुचाकीचा प्रवास करत जिल्हा मुख्यालय गाठले. जिल्हा मुख्यालयात पोहोचूनही त्यांना जन सुनावणीच्या सभागृहात जाऊन दिल्याने त्यांचीही निराशाच झाली. ही बातमी गावात झेंडेपार येथील नागरिकांनी गावातच ठिय्या आंदोलन करुन प्रस्तावित लोहखाणीला विरोध दर्शविला. लोहखाणीमुळे नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होणार असल्याने लोहखाणी आम्हाला मान्य नाहीत, असे या नागरिकांचे म्हणणे आहे.
“लोहखान परिसरातील रहिवासी, पंचायत पदाधिकारी , काही राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविले”
जनसुनावणीदरम्यान आपले मत मांडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हा सचिव डॉ.महेश कोपुलवार, एड.जगदीश मेश्राम, देवराव चवळे, अ.भा.रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, बीआरएसपीचे राज बन्सोड, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल मारकवार, एड.विवेक कोलते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, एड.लालसू नोगोटी, सैनू गोटा, नितीन पदा, दिनेश वड्डे आदींना पोलिसांनी अडवून जनसुनावणीला जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांनी प्रशासनाचा निषेध करीत जनसुनावणी एकतर्फी आणि भाजपप्रणित लोकांना सोबत घेऊन केल्याचा आरोप केला.