श्रीक्षेत्र मार्कंडातून वारसा जतनाची प्रेरणा: जागतिक वारसा दिनानिमित्त शैक्षणिक व स्वच्छता उपक्रम

गडचिरोली, १८ एप्रिल : जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्कंडा येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (नागपूर मंडळ) आणि मार्कंडा आदिवासी आश्रम शाळा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन आणि स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमा द्वारे विद्यार्थ्यांना भारतीय वारसा स्थळांचे संवर्धन, इतिहासाचे महत्त्व आणि पुरातत्व विभागाच्या कार्याची माहिती देण्यातआली, तसेच स्वच्छतेच्या माध्यमातून वारसा जतनाची जबाबदारी पटवून देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत मार्कंडा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मंदिर परिसरात शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. सुमारे १२व्या शतकातील या प्राचीन मंदिर समूहाच्या स्थापत्य वैशिष्ट्यांबद्दल, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक मूल्यांबाबत पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक शुभम कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मंदिरांच्या कलात्मक रचनेतील बारकावे, तत्कालीन समाजाची जीवनशैली आणि वारसा स्थळांचे जागतिक महत्त्व यावर प्रकाश टाकला. “आपला वारसा हा आपली ओळख आहे, त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे आवाहन त्यांनी केले. या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये इतिहासा बद्दल उत्सुकता आणि आदराची भावना निर्माण झाली.
उपक्रमाचा दुसरा महत्त्वाचा भाग होता मंदिर परिसरातील स्वच्छता मोहीम. पुरातत्व विभागाचे कर्मचारी, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर अनिष्ट घटकांचे संकलन केले. या मोहिमेतून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व आणि वारसा स्थळांच्या देखभालीची गरज समजली. स्वच्छता ही केवळ परिसर सुंदर ठेवण्यापुरती मर्यादित नसून, सांस्कृतिक ठेव्याचे रक्षण करण्याचा मार्ग आहे, हे त्यांना पटले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत परिसर स्वच्छ केला आणि यातून अभिमान व्यक्त केला.
या उपक्रमात शाळेचे अधीक्षक अरुण राऊत, शिक्षिका कृपांती बोरसरे, शिक्षक छबिलदास सुरपाम यांच्यासह पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्यामध्ये इतिहास आणि संस्कृतीबद्दल जिज्ञासा वाढवली, तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत वारसा संवर्धनाच्या आव्हानांबद्दल माहिती दिली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि संस्कारक्षम ठरला. श्रीक्षेत्र मार्कंडाच्या ऐतिहासिक सान्निध्यात घालवलेला हा काळत्यांना आपल्या मुळांशी जोडणारा होता. स्वच्छता मोहिमेतून त्यांनी पर्यावरण आणि वारसा जतनाचे धडे घेतले, तर शैक्षणिक मार्गदर्शनाने इतिहासाबद्दल आवड निर्माण झाली. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक बांधिलकी दृढकेली. श्रीक्षेत्र मार्कंडा येथील हा उपक्रम इतिहास, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम घडवणारा ठरला, आणि यातून मिळालेली प्रेरणा विद्यार्थ्यांना वारसा जतनाचे दूत बनण्यास प्रोत्साहित करेल.