हृदयाला जीवनस्पर्श: गडचिरोलीत सी.पी.आर प्रशिक्षणाची क्रांतिकारी मोहीम

गडचिरोली, १७ एप्रिल : बदलती जीवनशैली, वाढता मानसिक तणाव, अयोग्य आहार आणि अपुरी शारीरिक हालचाल यामुळे हृदयविकाराचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे. अचानक येणारा हृदयविकाराचा झटका जीवघेणा ठरू शकतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (सी.पी.आर) हे जीवनरक्षक कौशल्य अत्यंत प्रभावी ठरते. याच पार्श्वभूमीवर, गडचिरोली जिल्हा आरोग्य विभागाने सी.पी.आर प्रशिक्षणाची व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा उद्देश सामान्य नागरिकांना हे कौशल्य शिकवून आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यास सक्षम करणे आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले, “हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी रुग्णाला रुग्णालयात पोहोचे पर्यंत प्रथमोपचार म्हणून सी.पी.आर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कौशल्य केवळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर प्रत्येक सामान्य नागरिकासाठी आवश्यक आहे. योग्य वेळी दिलेले सी.पी.आर रुग्णाला नवसंजीवनी देऊ शकते.” सी.पी.आर प्रशिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने सहा टप्प्यांचा व्यापक कार्यक्रम आखला आहे, ज्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत हे जीवनरक्षक कौशल्य पोहोचेल.
या मोहिमेची अंमलबजावणी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले, ज्यामुळे राज्यभरात प्रशिक्षणाची मजबूत पायाभरणी झाली. दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले, ज्यामुळे जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रशिक्षणाचा प्रसार होण्यास मदत झाली. तिसऱ्या टप्प्यात तालुकास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले, ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रशिक्षणाला गती मिळाली. चौथ्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महिला ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा असल्याने त्यांच्या मार्फत मोहिमेचा प्रभाव वाढेल. पाचव्या टप्प्यात ग्राम आरोग्य समिती, ग्राम पोषण, स्वच्छता आणि पाणीपुरवठा समितीचे सदस्य तसेच सामान्य नागरिकांना प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे गावागावांत सी.पी.आर प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध होतील. सहाव्या टप्प्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यावर भर असेल, ज्यामुळे तरुण पिढीला हे कौशल्य आत्मसात करता येईल.
डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग सेंटर, गडचिरोली येथे हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. या मोहिमेमुळे हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता वाढेल आणि मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. सामान्य नागरिकांना सक्षम करून ही मोहीम गडचिरोलीत आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवत आहे. प्रत्येक व्यक्तीने सी.पी.आर प्रशिक्षण घेऊन या जीवनरक्षक मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.