इंस्टाग्राम ओळखीचा गैरफायदा! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अश्लील व्हिडीओ व्हायरल; आरोपी दिल्लीतून अटक

अहेरी (गडचिरोली), १८ एप्रिल : सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका 22 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहेरी पोलिसांनी आरोपी शाहनवाज मलिक (वय २२, रा. मेरठ, उत्तरप्रदेश) याला दिल्ली येथून अटक केली असून, अहेरी न्यायालयाने त्याला २१ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने गडचिरोलीत खळबळ उडाली आहे.
जून २०२३ मध्ये इंस्टाग्रामवर पीडित मुलीची आणि आरोपीची ओळख झाली. काही दिवसांच्या संवादानंतर आरोपी सेंट्रींगच्या कामानिमित्त अहेरी येथे आला. ११ जून २०२३ रोजी त्याने पीडितेशी पहिली भेट घेतली. जुलै १०२३ मध्ये त्याने मुलीला खोलीवर बोलावून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे अश्लील फोटो-व्हिडीओ मोबाइलमध्ये काढले. यानंतर, “तुझे फोटो व्हायरल करेन” अशी धमकी देऊन त्याने तिच्या अल्पवयाचा गैरफायदा घेत अनेकदा शारीरिक अत्याचार केले. व्हिडीओ कॉलद्वारे तिला कपडे काढण्यास भाग पाडून अश्लील व्हिडीओही तयार केले.
पीडितेने तिचे मामा लग्नासाठी मुलगा शोधत असल्याचे सांगितले असता, आरोपीने “तुझे कोणाशीही लग्न होऊ देणार नाही, तुला मारून टाकेन” अशा धमक्या दिल्या. पीडितेने लग्नासाठी मुलगा येणार असल्याचे कळवताच आरोपीने तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो तिच्या इंस्टाग्राम व फेसबुकवर अपलोड करून तिची बदनामी केली. या घटनेमुळे पीडितेवर आणि तिच्या कुटुंबावर मानसिक आघात झाला.
पीडितेच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आरोपी दिल्लीत पसार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी विशेष पथक पाठवून त्याला ताब्यात घेतले. अहेरी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २१ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली गेली. तपास अधिकारी स्वप्नील ईज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. आरोपीचा मोबाइल आणि इतर उपकरणे तपासली जात असून, बलात्कार, ब्लॅकमेलिंग, अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाने सोशल मीडियाच्या गैरवापराचा धोका पुन्हा अधोरेखित केला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलींना अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना सावधगिरी बाळगण्याचे आणि पालकांनी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक समाजात या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून, पीडितेला न्याय आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. तपास पूर्ण झाल्यावर आणखी खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.