उष्माघाताचा धोका वाढला; गडचिरोली आरोग्य विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन

गडचिरोली, 20 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे. तसेच, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी उष्माघाताची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन केले आहे.
उष्माघाताची लक्षणे गंभीर स्वरूपाची असू शकतात. यामध्ये तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उलटी, हृदयाचे ठोके वाढणे, शरीराचे तापमान 40°C (104°F) पेक्षा जास्त होणे, बेशुद्ध होणे, गरम–कोरडी त्वचा आणि अत्यधिक तहान लागणे यांचा समावेशआहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक गोंधळ, चिडचिड, थकवा आणि झटके यांसारखी लक्षणे दिसू शकतात. मुलांमध्ये भूकन लागणे, अत्यधिक चिडचिड, लघवी कमी होणे, अंधुक दिसणे, सुस्ती आणि रक्तस्त्राव अशी लक्षणे आढळतात. अशा परिस्थिती ततातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काही साध्या पण प्रभावी उपायांचा अवलंब करावा, असे आरोग्य विभागाने सुचवले आहे. घरातथंड वातावरण राखण्यासाठी पंखे, ओले कपडे, पडदे आणि सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवून आणि दिवसाखालच्या मजल्यावर राहून उष्णता कमी करता येते. आहारात प्रथिनेयुक्त आणि शिळे अन्न टाळावे, तसेच दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेयांचे सेवन बंद करावे. स्वयंपाकघर हवेशीर ठेवण्यासाठी खिडक्या–दरवाजे उघडे ठेवावेत.
बाहेर फिरताना पाणी किंवा ज्यूस सोबत ठेवून शरीर हायड्रेटेड ठेवावे. सैल, सुती कपडे, छत्री, टोपी आणि टॉवेल वापरून सूर्य प्रकाशाचा थेट संपर्क टाळावा. अनवाणी बाहेर जाणे धोकादायक ठरू शकते. विशेषत: एकटे राहणाऱ्या वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णाला थंड ठिकाणी हलवावे, थंड पाण्याचा मारा करावा, कपडे सैल करावेत आणि द्रवपदार्थ द्यावेत. तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या वापराव्यात. गंभीर लक्षणे आढळल्यास 108/102 या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाला दाखल करावे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा आणि स्वत:ची तसेच कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. उष्णतेच्या लाटेकडे हलकेपणाने पाहू नका, योग्य काळजी घेऊन सुरक्षित रहा, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.