गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आदिवासी अध्यासन केंद्र: आदिवासी विकासाला नवी दिशा

गडचिरोली, 20 एप्रिल : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे नव्याने आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 17 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णय (क्रमांक: सांकीर्ण-2024/प्र.क्र.109/ई-875610/विश-4) अंतर्गत, आदिवासीबहुल क्षेत्रातील सार्वजनिक विद्यापीठांमधील आदिवासी अध्यासन केंद्रांचे बळकटीकरण आणि नवीन केंद्र स्थापना यावर भर देण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठाला केंद्रबिंदू मानून हानिर्णय आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरेल.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 9.35% आहे. परंतु, 2020-21 मध्येआदिवासींचे उच्च शिक्षणातील नोंदणी प्रमाण (GER) केवळ 18.9% आहे, जे राष्ट्रीय सरासरी 28.4% पेक्षा कमी आहे. गोंडवाना विद्यापीठाची स्थापना आदिवासींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी झाली होती. तथापि, गडचिरोलीसह इतर आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, यासाठी हे नवीन केंद्र स्थापन होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या समावेशक शिक्षणाच्या तत्त्वांना अनुसरून, आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
गोंडवाना विद्यापीठातील आदिवासी अध्यासन केंद्र माडिया, गोंडी, बैगा, कोलम यांसारख्या आदिवासी भाषा, संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीचा अभ्यास आणि जतन करेल. यासोबतच, पर्यावरणीय पर्यटन, वन पर्यटन, जलमार्ग व्यवस्थापन, औषधी वनस्पती, बांबू–आधारित उद्योग आणि खनिजशास्त्र यांचे प्रशिक्षण देईल. हे केंद्र आदिवासी विद्यार्थ्यांचे GER वाढवण्यासाठी विशेष शिक्षणव्यवस्था आणि रोजगारक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय, आदिवासी विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचे मूल्यमापन आणि धोरणात्मक शिफारशी सादर करण्याचे कार्यही केंद्र करेल.
शासन निर्णयानुसार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ(नांदेड) आणि मुंबई विद्यापीठातील विद्यमान केंद्रांचे बळकटीकरण होईल, तर सांत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातही नवीन केंद्रस्थापन होईल. गोंडवाना विद्यापीठातील केंद्रासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा नियोजन समिती (DPC) यांच्याकडून प्रकल्प–आधारित निधी उपलब्ध होईल. केंद्रांच्या समन्वयासाठी अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्रशिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत होईल, ज्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतर सदस्य असतील. पुणे येथील उच्च शिक्षण संचालकालयात विशेष कक्ष स्थापन होईल.
हा निर्णय गडचिरोलीतील आदिवासी समुदायासाठी शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी मिळतील. गोंडी आणि माडिया संस्कृतीचे संवर्धन होऊन आदिवासी ओळखीला बळ मिळेल.