जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५: कोटगल व हल्दीपुरानी उपसा सिंचन योजनांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गडचिरोली, २४ एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील कोटगल (ता. गडचिरोली) आणि हल्दीपुरानी (ता. चामोर्शी) उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रात पाणी वापर संस्थांसाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. नाबार्ड आणि पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सत्रांमधून शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, जलसंधारण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कोटगल येथील सत्रात ८ पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पाण्याचा काटकसरीने वापर, नवीन क्रॉप पॅटर्न, अवोकाडो, स्ट्रॉबेरी, ऊस आणि भुईमूग यांसारख्या नगदी पिकांची लागवड तसेच समाधान आणि तक्रार निवारण यावर चर्चा झाली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षत्व केले. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नारायण पौनीकर, उपविभागीय अभियंता गणेश परदेशी आणि पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांना ड्रिप आणि स्प्रिंकलर सिंचन पद्धती, कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारी पिके आणि नाबार्डच्या कर्ज सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “पाण्याचा योग्य वापर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकतो,” असे श्री. पौनीकर यांनी सांगितले. अवोकाडो आणि स्ट्रॉबेरीसारख्या उच्च मूल्याच्या पिकांनी शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
हल्दीपुरानी योजनेच्या लाभक्षेत्रातील अड्याळ (ता. चामोर्शी) येथे गट ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित सत्रात जिल्हा अधीक्षककृषी अधिकारी आणि पाटबंधारे विभागाने पाणी वापर संस्थांना आधुनिक शेती , क्रॉप पॅटर्न आणि जलसंधारण याबाबत माहिती दिली. कृषी मंडळ अधिकारी श्री. वळवी , गणेश परदेशी , सरपंच कु. स्वाती टेकाम आणि कृष्ठापुर पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले. पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पुनर्भरण आणि कालव्यांची दुरुस्ती यावर विशेष भर देण्यात आला. श्री. वळवी यांनी जैविक खते आणि संकरित बियाणांचा वापर करण्याचे आवाहन केले. कु. टेकाम यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामपंचायतीच्या सहभागावर जोर दिला.
जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ हा उपक्रम पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण, जलसाक्षरता वाढवणे आणि पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी राबवला जात आहे. पाण्याची गळती रोखणे, कालवे दुरुस्ती आणि अनधिकृत पाणी वापराला आळा घालणे यावर भर देण्यात आला. स्थानिक शेतकऱ्यांनी या सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत, नवीन पिके आणि तंत्रज्ञाना बाबत उत्साह व्यक्त केला. कोटगल येथील एका शेतकऱ्याने सांगितले, “अवोकाडो आणि स्ट्रॉबेरीमुळे आमच्या उत्पन्नात वाढ होईल.” हल्दीपुरानीतील शेतकऱ्यांनी जलसंधारण प्रशिक्षण उपयुक्त ठरल्याचे सांगितले.
या सत्रांच्या यशानंतर पाटबंधारे विभाग आणि नाबार्डने नियमित प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक पाठबळ देण्याचे नियोजन केले आहे. कालव्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी स्थानिक प्रशासनाचा सहभाग वाढवला जाणार आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांना सक्षम बनवत पाण्याच्या शाश्वत वापराला चालना देत आहे.