गडचिरोलीतून दिव्यांग सशक्तीकरणाची मुहूर्तमेढ: १% निधी, जीवनाला नवी दिशा!

गडचिरोली, २४ एप्रिल : जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीतून चालू आर्थिक वर्षापासून दिव्यांग कल्याणासाठी १ टक्कानिधी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जाहीर केला आहे. या निधीतून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या आणि त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या परिणामकारक योजनांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी मानसी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज आणि जिल्हा पुनर्वसन केंद्राचे संचालक अभिजित राऊत उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी युडीआयडी कार्ड वाटपाची प्रगती तपासून प्रलंबित कार्ड्स तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. यासोबतच ‘नमो दिव्यांग शक्ती अभियान’, ‘निरामय आरोग्य विमा योजना’, शैक्षणिक सहाय्य उपक्रम, नवजात बालकांसाठी श्रवण तपासणी युनिट, सहाय्यक उपकरणांचे वाटप आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांचा आढावा घेण्यात आला.
“दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या निधीचा वापर त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवणाऱ्या योजनांसाठी होईल,” असे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.
या निर्णयाचे स्वागत करत अभिजित राऊत आणि चेतन हिवंज यांनी सादरीकरणाद्वारे योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी ही योजना आशेचा किरण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.