अनुसूचित जाती व नवबौध्द बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर खरेदीला थेट 3.15 लाखांचे अर्थसहाय्य

गडचिरोली, 23 मे : अनुसूचित जाती (SC) आणि नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना (SHG) शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने खरेदी करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण योजनेत सुधारणा केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार, वस्तू स्वरूपातील लाभाऐवजी आता थेट 3 लाख 15 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गटातील सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत आणि किमान 80% सदस्य, तसेच अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती किंवा नवबौध्द घटकांतील असणे आवश्यक आहे. ट्रॅक्टर आणि उपसाधने भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या मानकांनुसार तपासलेली असावीत. गटाला ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि खरेदी केलेले ट्रॅक्टर 10 वर्षांपर्यंत विकता किंवा गहाण ठेवता येणार नाही, यासाठी दरवर्षी हमीपत्र सादर करावे लागेल.
यापूर्वी पावर टिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतलेले गट या योजनेस अपात्र ठरतील. इच्छुक पात्र गटांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 9423116168 या क्रमांकावर संपर्क करा.
“ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौध्द गटांना शेतीसाठी आधुनिक साधने उपलब्ध करून आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी ठरणार आहे.”