March 7, 2026

अहेरी उपविभागात नवे नेतृत्व: संजय आसवले यांनी पदभार स्वीकारला

“अहेरीच्या प्रगतीला गती: संजय आसवले यांचा अपर जिल्हाधिकारीपदी दमदार शुभारंभ”

अहेरी, 21 जून (आनंद दहेगांवकर) : दक्षिण गडचिरोलीच्या अहेरी उपविभागात अपर जिल्हाधिकारी म्हणून संजय दत्तात्रय आसवले यांनी 19 मे 2025 रोजी पदभार स्वीकारला आहे. कोल्हापूरचे रहिवासी असलेले आसवले यांचा प्रशासकीय सेवेतील समृद्ध अनुभव आणि पत्रकारितेची प्रभावी पार्श्वभूमी यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे स्थानिक जनता आशेने पाहत आहे. अहेरी, सिरोंचा, एटापल्ली आणि भामरागड या चार तालुक्यांचा समावेश असलेल्या या नक्षलग्रस्त आणि दुर्गम उपविभागातील प्रशासकीय कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

संजय आसवले यांनी 2004 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे नायब तहसीलदार म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर सांगली, सोलापूर आणि सातारा येथे विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. सातारा येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांची पदोन्नती होऊन अहेरी येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. प्रशासकीय सेवेपूर्वी आसवले यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही आपली छाप पाडली. विद्यार्थिदशेत स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यांनी ‘दै. पुण्य नगरी’सह कोल्हापूर, नाशिक आणि बेडगाव येथे विविध दैनिकांमध्ये उपसंपादक म्हणून काम केले. निकाल लागेपर्यंतही त्यांनी लिखाण सुरू ठेवले, ज्यामुळे त्यांना पत्रकारितेचा दांडगा अनुभव मिळाला. हा अनुभव स्थानिक समस्यांचा अभ्यास आणि जनतेशी संवाद साधण्यात उपयुक्त ठरत आहे.

अहेरी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय 2010 मध्ये स्थापन झाले. सुरुवातीला दामोधर नान्हे यांच्याकडे प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी होती. 2011 पर्यंत 8 प्रभारी अधिकाऱ्यांनी काम पाहिले, तर 2019 पर्यंत संजय धिवरे, महेश आव्हाड आणि पुन्हा नान्हे यांनी पूर्णवेळ सेवा दिली. 2019 ते 2023 या काळात सोनप्पा यमगर आणि विजय भाकरे यांच्याव्यतिरिक्त इतर अधिकाऱ्यांकडे प्रभारी जबाबदारी होती. बहुतांश अधिकारी गडचिरोली मुख्यालयातून कामकाज पाहत होते, परंतु 7 ऑगस्ट 2023 रोजी विजय भाकरे यांनी अहेरीत राहून ग्राउंड लेव्हलवर काम केले. त्यांच्या कार्यकाळात स्थानिक स्तरावर विकासकामांना गती मिळाली. मार्च 2025 मध्ये भाकरे यांची भंडारा येथे बदली झाल्यानंतर कुशल जैन यांच्याकडे तात्पुरता प्रभार होता. आता आसवले हे 19 वे अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.

अहेरी उपविभागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढवणे हे आसवले यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय कामे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी त्यांचा पत्रकारितेचा अनुभव आणि संवेदनशील दृष्टिकोन महत्त्वाचा ठरेल. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश गावडे म्हणाले, “आसवले यांचा अनुभव आणि जनतेशी संवादाची क्षमता यामुळे विकासकामांना चालना मिळेल.” व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय तिवारी यांनीही स्थानिक स्तरावर राहून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आसवले यांच्या नेतृत्वाखाली अहेरी उपविभागातील प्रशासकीय कामांना नवी दिशा मिळेल आणि स्थानिक जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील, अशी आशा आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!